दापोली / मनोज पवार :
अन्नसाखळीमध्ये सर्वोत्तम असणाऱ्या पट्टेरी वाघांचे अस्तित्व सध्या रत्नागिरी जिह्यातून पुसून गेलेले आहे. संपूर्ण जिह्यामध्ये असणाऱ्या वनक्षेत्रापैकी 99 टक्के वनक्षेत्र हे खासगी मालकीचे आहे. केवळ 1 टक्का वनक्षेत्र हे वन विभागाकडे आहे. यामुळे व्याघ्र प्रकल्प राबवण्यात अडचणी येत असून जिह्यामध्ये एकही स्थायिक वाघ नसल्याची माहिती जागतिक व्याघ्र दिनानिमित्त केलेल्या पाहणीत पुढे आली आहे.
जिह्यामध्ये सध्या चार पट्टेरी वाघांचा वावर असल्याचे नुकतेच चिपळूण येथे झालेल्या एका कार्यक्रमात वन विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले होते. मात्र हे वाघ जिह्यामध्ये स्थायिक नसून जिह्याच्या बाहेरुन त्यांच्या नैसर्गिक ‘पेट्रोलिंग’ करिता येत असल्याची माहिती चिपळूण येथील व्याघ्र अभ्यासक ओंकार बापट यांनी ‘तऊण भारत संवाद’शी बोलताना दिली.
बापट म्हणाले, वाघांची संख्या वाढण्याकरिता मुख्यत्वे त्यांचे खाद्य व मिलनाकरिता मादी या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. शिवाय उंच डोंगर व खोल दऱ्या या वाघांसाठी उपयुक्त नसतात. त्याच जिह्यात मोठ्या प्रमाणात आहेत. वाघांच्या संख्या वाढीकरिता विस्तीर्ण गवताळ प्रदेश आवश्यक असतो. गवताळ प्रदेशामुळे वाघांचे खाद्य असणाऱ्या चितळांची संख्या वाढते. असा गवताळ प्रदेश चांदोली येथे असल्याने तेथे काही प्रमाणात वाघ टिकून आहेत. तसेच तेथे गोवा व कर्नाटक यांच्या हद्दी जवळ असल्याने परराज्यातून देखील वाघ काही प्रमाणात सिंधुदुर्गात येतात. मात्र रत्नागिरी जिह्यामध्ये दुसऱ्या जिह्यातून येणाऱ्या वाघांचे प्रमाण कमी आहे.
चिपळूणमध्ये ट्रॅप झालेला वाघ हा कोयना अभयारण्यातून आलेला होता. हे वाघ आपली हद्द निश्चित करण्याकरिता येत असतात. सात ते आठ वर्षांपूर्वी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प घोषित झाल्यावर चांदोली येथे प्रथम गवताळ प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. यानंतर सागरेश्वर अभयारण्यातून 50 चितळ आणून तेथे सोडण्यात आले. यामुळे तेथे वाघांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली व टिकली.
मात्र रत्नागिरी जिह्यामध्ये वन विभागाचे वनक्षेत्र केवळ एक टक्का असल्यामुळे यात अडचणी निर्माण होत आहेत. जिह्यामध्ये वाघांची संख्या वाढवण्याकरिता वाईल्ड लाईफ विंग तयार करावी लागेल. तसेच वाघांना आवश्यक असणारे खाद्य पुरवण्याकरिता येथे सर्वप्रथम शाकाहारी प्राण्यांना लागणाऱ्या गवताची जाणीवपूर्वक उपज करावी लागेल, असेही बापट यांनी स्पष्ट केले.
- वाघांची संख्या वाढवण्याच्या उपक्रमांना ‘ब्रेक’
जे खासगी वनक्षेत्र जिह्यात आहे ते वनविभागाकडे हस्तांतरित करावे लागेल. मात्र ही प्रक्रिया मोठी आहे. यामुळे सध्या तरी जिह्यातील व्याघ्र संख्या वाढवण्याच्या उपक्रमांना ब्रेक लागल्याचे दिसून येत असल्याची खंत ओंकार बापट यांनी व्यक्त केली.








