11 जखमींना वाचविण्यास यश : अनेक जण वाहून गेल्याचा संशय
वृत्तसंस्था/ मुक्तसर
पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी मुक्तसर-कोटकपूरा मार्गावर प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात कोसळली आहे. ही बस मुक्तसर येथून कोटकपुराच्या दिशेने जात होती. बस कालव्याच्या पूलावरील लोखंडी अँगलला धडकल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता आहेत.
मृत प्रवाशांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. मृत प्रवासी मुक्तसर, फाजिल्का, फरीदकोट आणि भटिंडा येथील रहिवासी होते. तर 3 मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. तर 11 जखमींना वाचविण्यास यश आले आहे.
प्रशासनानुसार बसमधून सुमारे 35 जण प्रवास करत होते. यामुळे अनेक जण कालव्यामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. बसचालकाने अचानक ब्रेक लावल्याने तो वाहनावरील नियंत्रण गमावून बसल्याचे प्रारंभिक तपासात दिसून आले आहे.
दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी रुही दुग यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. स्थिती पाहून त्यांनी त्वरित एनडीआरएफच्या पथकांना पाचारण केले आहे. एनडीआरएफची पथके मोटरबोटद्वारे कालव्यात बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत.









