खानापूर कुस्ती मैदान : पंकज चापगाव, महेश तीर्थकुंडये मेंढ्याचे मानकरी, ऋतुजा रावळचा प्रेक्षणीय विजय
खानापूर : खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात सध्याचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळने सातव्या मिनिटाला एकेरीपट काढून नागपटी लावून लपेट डावावरती आसमान दाखवित उपस्थित 15 हजारहून अधिक कुस्ती शौकीनांची मने जिंकली. प्रमुख कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ व भारत केसरी सोनू कुमार हरियाणा ही कुस्ती खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, जेडीएसचे नेते नासीर बागवान, हणमंत गुरव व खानापूर कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला सोनू हरियाणाने एकेरीपट काढून पृथ्वीराज मोहोळला खाली घेऊन फिरविण्याचा प्रयत्न केला. खालून दशरंग मारुन पृथ्वीराज मोहोळने सुटका करुन घेतली. चौथ्या मिनिटाला पृथ्वीराजने पायाला टाच मारुन सोनूला खाली घेत हात लावून घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. पण सोनूने खालून डंकी मारुन पुन्हा पृथ्वीराजवर कब्जा मिळविला. सहाव्या मिनिटाला पृथ्वीराज मोहोळने एकेरीपट काढून सोनूला खाली घेतले. व एकेरी हाताचा कच चढवित नागपट्टी लावून फिरविताना सोनू कुमारला कळत नकळत लफेट डावावरती चारीमुंड्या चित्त करुन उपस्थित कुस्ती शौकीनांची मने जिंकली.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी शुंभम सिदनाळे व हिमाचल केसरी पवन कुमार ही कुस्ती लैला शुगर्सचे एम. डी. सदानंद पाटील, अर्बन बँकेचे चेअरमन अमृत शेलार, मारुती पाटील, संजय कुबल, पंडित ओगले, विजय गुरव यासह इतरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला शुंभम सिदनालेनी पवन कुमारला एकेरीपट काढून खाली घेत घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. पण तितक्याच चलाखीने पवन कुमारने सुटका करुन घेतली. पाचव्या मिनिटाला पवन कुमारने एकेरीपट काढून शुंभमला खाली घेण्याचा प्रयत्न करत असताना शुंभम सिदनाळेच्या घुडघ्याला जबर दुखापत झाल्याने कुस्ती थांबवण्यात आली. ही दुखापत गंभीर असल्याने पंचानी ही कुस्ती बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोटे ही कुस्ती माजी आमदार अरविंद पाटील,सुरेश देसाई, संजय कुबल आणि इतर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत पहिल्याच मिनिटाला संदीप मोटे यांनी एकेरीपट काढून कार्तिकला खाली घेतले. व एकलांगी मारुन चित्त करण्याचा प्रयत्न करताना कार्तिकने खालून डंकी मारुन संदीप मोटेवर कब्जा मिळविला. व आपला हुकमी डाव एकलांगी भरण्याचा प्रयत्न केला. पण संदीपने एकलांगीतून सुटका करुन घेतली. आठव्या मिनिटाला कार्तिकने एकेरीपट उपसत संदीप मोटेवर कब्जा मिळविला. व एकचाक मारण्याचा प्रयत्न केला. पण बळदंड शरीराच्या संदीप मोटेला एकचाकावर फिरवण्याचा असफल प्रयत्न झाला. ही कुस्ती डाव प्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली.

चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत शिवय्या पुजारी व ओम माने कोल्हापूर या कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला शिवय्या पुजारीने एकेरीपट काढून धोबीपचाड मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून ओम मानेने सुटका करुन घेतली. ही कुस्ती डाव प्रतिडावाने झुंजली. पण वेळेवर अभावी गुणावर खेळविण्यात आली. त्यामध्ये शिवय्याने एकेरीपट काढून ओम मानेवर कब्जा मिळवून गुण मिळवित विजय मिळविला. पाचव्या क्रमाकांच्या कुस्तीत शिवा दड्डीने सुनिल करवतेला घिस्सा डावावर विजय मिळविला. सहाव्या क्रमाकांच्या कुस्तीत प्रेम कंग्राळीने संजूला इंगळगीला एकेरी पटावर घेऊन धडक मारण्याचा प्रयत्न करत असताना संजूला पायाला गंभीर दुखापत झाल्याने प्रेमला विजय घोषित करण्यात आला. सातव्या क्रमाकांच्या कुस्तीत विक्रम शिनोळीला बस्सू जगदाळे न आल्यामुळे विजय घोषित करण्यात आले. आठव्या क्रमाकांच्या कुस्तीत पृथ्वीराज पाटीलने गिरीश चिक्कबागेवाडीला निकाली डावावर पराभव केले. नवव्या क्रमाकांची कुस्ती पवन चिक्कदिनकोप व श्रीनाथ ढेकोळे ही कुस्ती बरोबरीत राहिल्याने दहाव्या क्रमाकांच्या कुस्ती सिद्धू धारवाडने निखिल कंग्राळीला एकचाक डावावरती पराभव केला. त्याचप्रमाणे सुमित कडोली झोळीवर, विनायक येळळूरने एकचाकवर, ओंमकार राशीवडे झोळीवर, रोहन कडोली निकालीवर, महांतेश संतिबस्तवाडने एकचाकवर, प्रल्हाद मुचंडीने एकचाकवर, त्याचप्रमाणे राहूल किणये, जोतिबा चापगाव, नचिकेत रणकुंडये, दुर्गेश संतिबस्तवाड, प्रज्वल मच्छे, मंजुनाथ संतिबस्तवाड, सुजल फौंडेकर, संग्राम मोदेकोप, प्रज्वल मजगाव, राहूल तिर्थकुंडये, श्रीधर शिनोळी, स्वराज्य शिनोळी, समर्थ किणये, रिधांत मजगाव, शंकर तिर्थपुंडये, दुर्गेश संतिबस्तावड यांनी प्रतिस्पर्धेवर विजय मिळविले.

मेंढ्याच्या कुस्तीत पंकज चापगावने रामदास काकतीचा कलाजंक डावावरती विजय मिळवून तर दुसऱ्या मेंढ्याच्या कुस्तीत महेश तिर्थकुंडयेने काशिलिंग जमखंडीचा झोळी डावावरती पराभव करुन मेंढ्याचे बक्षीस पटकाविले. महिलांच्या कुस्तीत वनश्री सरदेसाई, बिनामोहळीन यांच्या हस्ते ऋतुजा रावळ व ऋतुजा वडगाव यांच्यात लावण्यात आली. ऋतुजा वडगावने एकेरीपाट काढून रावळला खाली घेत घिस्यावरती फिरविताना रावळने खालून डंकी मारुनी ऋतूजाला चांरीमुंड्या चित्त केले. आराध्या हलगेकरनी श्रृतीला झोळीवर पराभव केला. तनुजा गुरव व ऋतुजा रावळ ही कुस्ती बरोबरीत राहिली. आखाड्याचे पंच म्हणून लक्ष्मण बामणे, पांडुरंग पाटील, बाळाराम पाटील, प्रदीप देसाई, मधूकर पाटील, राजू गुरव, लक्ष्मण पाटील, सत्याप्पा मुत्यानहट्टी, पिराजी मुंचडीकर, बाळासाहेब सुतार, नवीनकुमार मुतगा, दौलत कुगजी, अतुल शिरोळे, रमेश नाईक, प्रकाश तिर्थकुंडये, प्रकाश पाटील, सुरेश अष्टगी, बाहुबली बस्तवाड यांनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णकांत चौगुले राशीवडें व प्रकाश मजगावी यांनी केले. तर यळगुडच्या कृष्णकांत घुळे व त्याच्या सहकार्यानी आपल्या हलगीच्या तालावर सर्व कुस्ती शौकीनाना खिळवून ठेवले.

योग्य नियोजनचा अभाव
खानापूर कुस्ती मैदानात आखाड्याचे योग्यरितीने नियोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेक मल्लांना दुखापतीला सामोरे जावे लागले. लहान मोठे असे दहा मल्ल दुखापतीने त्रस्त झाले होते, त्यामुळे कुस्ती शौकीनातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
पावसाचे आभार
बेळगाव व खानापूर तालुका परिसरात दुपारपासूनच पावसाने दमदार सुरुवात केली होती. मैदान होणार की नाही, यावर शंका निर्माण झाली होती. कुस्तीगीर संघटनेने मैदानावर आच्छादनाचे सोय केल्यामुळे मैदान पावसापासून सुरक्षित राहिले. कुस्तीच्या सुरवातीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने रात्री उशिरापर्यंत कुस्त्या पूर्ण झाल्या. यात कोणताही पावसाचा व्यत्यय आला नाही. त्यामुळे कुस्ती शौकीनानी वरुणदेवाचे आभार मानले.









