Prithviraj Chavan On Narendra Modi : बीआरएस ही भाजपची बी टीम आहे. त्यांना सर्व रसद भाजपच्या वतीने पुरवण्यात येत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अर्थव्यवस्था कोलमडलीय, केवळ जाहीरातबाजीवर हे सरकार चालू आहे. मणिपूर पेटलय पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नाहीत. जनता आता कंटाळली आहे. नरेंद्र मोदी हुकुमशाहीकडे चाललेले आहेत. देशातील लोकशाही अस्तित्वात राहणार नाही, असा सूचक इशारा देतानाच या देशाची लोकशाही टिकवण्यासाठी आमची लढाई असल्याचेही ते म्हणाले. आज ते इचलकरंजीत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसकडून 24 टीम महाराष्ट्र राज्यात पाठवल्या आहेत. 48 लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला जात आहे. माझ्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. आता केवळ आम्ही मित्रपक्ष, विरोधात कोण आहे, आमची ताकद किती आहे याचा आढावा घेत आहोत. कर्नाटक पॅटर्न काँग्रेसने महाराष्ट्रात राबवला आहे. राज्यात आम्ही तिन्ही पक्ष एकत्रपणे भाजपला विरोध करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटल्यानंतर मतदार संघात काय भावना आहेत हे मी पाहतोय, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की,बीआरएस ही भाजपची बी टीम आहे.त्यांना सर्व रसद भाजपच्या वतीने देण्यात येत आहे.नाराज बंडखोर यांना आपल्या बाजूनं घेण्यात येत आहे. पक्ष फुटले असले तरी जनता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूनं आहे.नागरिक निवडणुकीची वाट पाहत आहेत.
राजू शेट्टी यांच्याविषयी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राजू शेट्टी हे कधीही भाजप सोबत जाणार नाहीत. नेहमी त्यांनी जातीवादी पक्षांना विरोध केला आहे. राजू शेट्टी यांच्या सोबत महाविकास आघाडीची चर्चा चालू आहे. विरोधक ‘इंडिया’ आघाडीची ताकद वाढत असल्याचेही ते म्हणाले.








