वृत्तसंस्था/ लंडन
सध्या इंग्लंडमध्ये रॉयल लंडन वनडे कप ही महत्त्वाची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. नॉर्दम्पटनशायर कौंटी संघासाठी खेळत असलेला भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने सॉमरसेट संघाविरुद्ध खेळताना शानदार फटकेबाजी करत द्विशतक साजरे केले. 129 चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे शंभर ते दोनशे हा टप्पा पार करण्यासाठी त्याने केवळ 48 चेंडूंचा सामना केला. पृथ्वीने त्याचे नववे लिस्ट ए शतक नोंदवले. यासह त्याने दोन वर्षांचा दुष्काळही संपवला. त्याने 2021 मध्ये विजय हजारे ट्रॉफीत त्याचे शेवटचे शतक झळकावले होते. पृथ्वी शॉला पहिल्या 100 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 81 चेंडू लागले. यानंतर पुढील 100 धावा त्याने अवघ्या 48 चेंडूत चोपल्या. या कामगिरीसह तो इंग्लंडमधील लिस्ट ए मध्ये सर्वाधिक स्कोर करणारा खेळाडू बनला आहे. त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली (183 धावा) आणि कपिल देव (नाबाद 175 धावा) यांचे रेकॉर्ड मोडले. पृथ्वीने 153 बॉलमध्ये 28 चौकार आणि 11 खणखणीत सिक्सच्या मदतीने 244 धावांची ऐतिहासिक खेळी केली. पृथ्वीच्या या खेळीच्या जोरावर नॉर्थहॅम्प्टनशायरने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 415 धावा केल्या. यामुळे समरसेटला 416 धावांचं अवघड आव्हान दिलं आहे. दरम्यान पृथ्वीने 4 ऑगस्ट रोजी ग्लुसेस्टरशायरविरुद्ध इंग्लंड क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पहिल्या दोन सामन्यात त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती. या सामन्यात मात्र त्याने चमक दाखवताना आपला जलवा दाखवून दिला.









