पुणे / वार्ताहर :
कडाक्याच्या थंडीमुळे राज्यभरातील सर्व कारागृहातील कैद्यांना आंघाेळीसाठी गरम पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारागृह प्रशासनाने शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली.
राज्यभरातील कारागृहांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी व त्या दूर करण्यासाठी कारागृह महानिरीक्षक व अपर पाेलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी अनेक कैद्यांनी सध्या कडाक्याची थंडी सुरु असल्याने आंघाेळीसाठी गरम पाणी आणि झोपण्यासाठी सतरंजी, चादर, उशी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्याप्रमाणे सर्व कारागृह अधीक्षकांना कैद्यांना गरम पाणी आणि झाेपण्यासाठी आवश्यक सामान पुरविण्यात यावे, अशा सूचना करण्यात आल्या. तसेच आवश्यकता भासल्यास ज्या कारागृहात संबंधित वस्तू तयार करण्यात येतात, त्यांच्याकडून उपलब्ध कराव्यात, अशा सूचना दिल्या.
दरम्यान, गुप्ता यांच्या कारागृह भेटीवेळी कैद्यांच्या भेटीसाठी कारागृहाबाहेर माेठया प्रमाणात गर्दी दिसून आली. त्यामुळे सर्व कैद्यांच्या मुलाखती वेळेत पूर्ण हाेण्यासाठी मुलाखतीसाठीच्या खिडक्या आणखी वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या.








