इराणमध्ये महिलांच्या हक्कांसाठी भरीव कार्य : धर्मांध प्रशासनाविरोधात वेळोवेळी आंदोलन
वृत्तसंस्था / स्टॉकहोम
इराणमधील धार्मिक दमनाच्या विरोधात लढणाऱ्या आणि सध्या त्याच लढ्यामुळे कारागृहात डांबण्यात आलेल्या क्रांतदर्शी आणि महिला अधिकारांच्या कार्यकर्त्या नर्गेस मोहम्मदी यांना 2023 चा विश्वशांती नोबेल पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. नॉर्वेतील नोबेल समितीने शुक्रवारी ही घोषणा केली.
मोहम्मदी यांनी इराणमधील धर्मांध प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले आहे. महिलांवर घातलेल्या अनिष्ट आणि दमनकारी धार्मिक बंधनांविरोधात त्यांनी इराणमधील महिलांना एकत्र करण्याचे कार्य केले आहे. बुरखा सक्तीविरोधात त्यांनी छेडलेल्या आंदोलनाला इराणच्या जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला होता. दोन वर्षे चाललेल्या या आंदोलनाचे पडसाद आजही त्या देशामध्ये उमटत आहेत. त्यांच्या या असामान्य कार्यासाठी त्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या मोहम्मदी कारागृहात असून त्यांना 31 वर्षांच्या कारावासाची शिक्षा इराणमधील इस्लामी न्यायालयाने ठोठावली आहे.
मोहम्मदी कोण आहेत?
मोहम्मदी या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांचे वय 51 वर्षे असून तरुण वयापासूनच त्यांनी महिलांचे अनाठायी बंधनांविरोधात प्रबोधन चालविले आहे. त्यांच्या कार्याला धर्मविरोधी ठरवून त्यांना गेल्या 20 वर्षांमध्ये अनेकदा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून सध्या त्यांना 31 वर्षांची सर्वात मोठी शिक्षा देण्यात आली आहे. त्यांच्या अन्यायाविरोधात लढ्याचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे वक्तव्य नोबेल पुरस्कार निवड समितीने केले आहे.









