दोन गावठी पिस्टल व काडतुस जप्त, 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी/ सातारा
बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱयास पकडून दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण 1 लाख 80 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. याप्रकरणी अल्तमेश हारुण तांबोळी (वय 22, रा. मंगळवार पेठ सातारा) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गोपनिय माहिती मिळाली की, अल्तमेश तांबोळी हा माजगाव फाटा (ता. सातारा) येथे गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी घेऊन येणार आहे. यानुसार त्याठिकाणी सापळा लावून कारवाई करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. शनिवार 20 रोजी सायंकाळी 8.30 च्या सुमारास अल्तमेश हा माजगाव फाटा येथे आला. यावेळी त्याला पकडून अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या ताब्यात दोन देशी बनावटीची पिस्टल, एक जिवंत काडतुस व एक मोपेड गाडी असा एकूण 1 लाख 80 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या कारवाईत पोलीस अंमलदार उत्तमराव दबडे, तानाजी माने, विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, संतोष पवार, अतिश घाडगे, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडिक, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाणे, प्रविण पवार, मयुर देशमुख, मोहसीन मोमीण, संकेत निकम, गणेश कचरे यांनी सहभाग घेतला.









