एपीएमसी पोलिसांकडून काही तासांतच फरारी कैद्याला अटक : कारागृहात आत्महत्येचाही प्रयत्न
बेळगाव : पोक्सो प्रकरणातील कैद्याने हिंडलगा कारागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, मंगळवार दि. 28 रोजी सकाळी 8.45 च्या दरम्यान त्याने एमआयसीयू विभागातील वॉशरूममध्ये तोंड धुण्याच्या बहाण्याने जाऊन तेथील व्हेंटिलेटरच्या खिडकीतून उडी टाकून पलायन केल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी तातडीने तपासचक्रे गतिमान करून मंगळवारी रात्री आरोपीला न्यायालय आवारातून अटक केली. अनिल रामा उर्फ तम्मानी लंबूगोळ रा. अंकली असे अटक करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. पोक्सो प्रकरणात जिल्हा पोक्सो न्यायालयाने 2022 मध्ये आरोपीला 20 वर्षांचा सश्रम कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावल्याने तो हिंडलगा कारागृहात बंदिस्त होता. त्याला कैदी क्र. 4800 म्हणून ओळखले जात होते.
आरोपीला कारागृहातील आठव्या बॅरेकमध्ये बंदिस्त ठेवण्यात आले होते. रविवार दि. 26 रोजी बॅरेकचा दरवाजा उघडला असता कारागृह अधिकाऱ्यांना आरोपी विचित्र प्रकारे वागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला अतिदक्षता विभागातील बॅरेक क्र. 6 मध्ये बंदिस्त ठेवण्यात आले. कैदी अनिलने त्याच दिवशी दुपारी 1.30 ते 1.45 च्या दरम्यान टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कारागृहातील वैद्याधिकाऱ्यांच्या शिफारशीवरून त्याला कारागृह मुख्य वॉर्डन एस. एम. मुजावर, राजकुमार पी. के. आणि एम. बी. कपरी यांनी 2.05 च्या दरम्यान कारागृहाच्या रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल केले. डॉक्टरांनी निरीक्षण करून उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी नवीन एमआयसीयूमध्ये दाखल करण्याची सूचना केली.
त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याने कारागृह प्रशासनाच्यावतीने त्याच्यावर नजर ठेवण्यात आली होती. मात्र मंगळवार दि. 28 रोजी सकाळी 8.30 ते 8.45 च्या दरम्यान कैदी अनिलने एमआयसीयू विभागातील वॉशरूममध्ये तेंड धुण्यासाठी जाण्याच्या निमित्ताने आत प्रवेश केला. त्यानंतर व्हेंटीलेटरच्या खिडकीतून उडी टाकून पलायन केले. ही घटना घडताच सिव्हिल हॉस्पिटल परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान अवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी कारागृहाचे मुख्य अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत फरारी कैद्याच्या अटकेसाठी तपासचक्रे गतिमान केली. सदर कैदी न्यायालयाच्या आवारात फिरत असल्याचे समजताच मंगळवारी रात्री त्याला अटक करून त्याची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात आली.









