वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई सिंडिकेटशी संबंधित दिल्लीतील कुख्यात गुंड आणि कैदी सलमान त्यागी याने मंडोली तुरुंगात आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. चादरीच्या सहाय्याने त्याने फाशी घेतल्याचे आढळून आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या रात्री तुरुंग क्रमांक 15 मधील त्याच्या बॅरेकमध्ये लोखंडी जाळीच्या साहाय्याने गुंड फाशीने लटकलेला आढळला. त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. हर्ष विहार पोलीस ठाण्याने मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी जीटीबी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याने आत्महत्या का केली, त्याला तुरुंगातील प्रतिस्पर्धी टोळीकडून धोका होता की तुरुंगाधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात होता, याबाबत सध्या काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही. तसेच मृताकडून कोणतीही सुसाईड नोटही सापडलेली नाही.
सलमान त्यागी हा तिहार भागातील रहिवासी होता. त्याने गावातील रहिवासी सद्दाम गौरीसोबत त्यागी नावाची टोळी तयार केली होती. ही टोळी पश्चिम दिल्लीत दहशत माजवत होती. सलमानवर खून, खंडणी, दरोडा, जबरदस्तीने वसुली, जमीन हडप करणे आणि बलात्कार असे 25 गुन्हे दाखल होते. तो गेल्या 15 वर्षांपासून गुन्हे करत होता. त्याने गुन्हेगारीतून तिहार गावात अनेक जमिनी बळकावल्या आणि गुह्यातून मिळवलेल्या पैशातून इतरांच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात आढळून आले होते.









