पणजी : कोलवाळ कारागृहात शुक्रवारी 29 वर्षीय मोहम्मद रेहान या कैद्यावर कैद्यांच्या एका गटाने हल्ला केल्याची घटना घडली. त्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी ऊग्णालयात नेण्यात आले. या संघर्षामागील कारण अद्याप तपासाधीन आहे. मडगाव येथील टोळी हल्ला प्रकरणात अटक केलेल्या टोळीने हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मोहम्मद रेहान याला एनडीपीएस तक्रारीत अटक करण्यात आली होती. त्याच्यावर न्यायालयात खटला सुऊ असून तो कोठडीत आहे. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी सकाळी कारागृहाच्या आवारात ही घटना घडली. आठ ते दहा कैद्यांनी मोहम्मद रेहान या कैद्याला घेरले आणि त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर जबर दुखापत झाली आहे. उपचारासाठी इस्पितळात नेले जात असताना रेहानने पत्रकारांना सांगितले की, संशयित कैद्यांनी त्याला त्यांच्या विभागात बोलावून घेतले आणि त्यानंतर हा हल्ला केला. या घटनेनंतर दुपारपर्यंत कारागृह प्रशासनाने कोलवाळ पोलिसांत कोणतीही तक्रार नोंदवली नव्हती. त्यामुळे या मारहाणीमागील नेमके कारण काय आहे, तसेच संशयित कैद्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. हल्ल्यात जखमी झालेला मोहम्मद रेहान शरीफ याला गेल्या जानेवारीमध्ये गुन्हा शाखेने ड्रग्जप्रकरणी अटक केली होती आणि त्याच्याकडून 1 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला होता.









