चीनमध्ये जेलच्या थीमच्या बारचे प्रचलन वाढत चालले आहे. येथे अनेक असे बार सुरू झाले आहेत, ज्याच्या आत लोकांना तुरुंगात गेल्यासारखी जाणीव होते. सध्या चीनमध्ये जेल थीमयुक्त बारमध्ये ग्राहक अनोख्या अनुभव घेण्याच्या शोधात पोहोचत आहेत. तसेच येथे घालविलेल्या क्षणांना सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या तुरुंग शैलीच्या बारमध्ये ग्राहकांनी प्रवेश करताच त्यांच्याकडून गुन्हा मान्य करवून घेतला जातो. मग छायाचित्रे काढली जातात. यानंतर त्यांना कोठडीत पाठविण्यात येते. तेथे बेडया आणि अन्य शिक्षा देणारी उपकरणे असतात.
बारमध्ये काम करणारा स्टाफ कैद्यांसारख्या नारिंगी जंपसूट परिधान करतो .तर बारच्या काही हिस्स्यांमध्ये तुरुंगाप्रमाणे लोखंडी गज लावण्यात आलेले असतात. याचबरोबर संशयितांची छायाचित्रे आणि जुन्या वृत्तपत्रांनी सजलेल्या भित्तिचित्रांनी या बारच्या भिंती झाकोळून गेलेल्या असतात. बारमध्ये ग्राहकांच्या कक्षांना वेगळ्या रुपात डिझाइन करण्यात आले आहे. तुरुंगाच्या वातावरणाला आणखी रोमांचक करण्यासाठी बारमालकांनी चौकशीकक्षात एक अंधारयुक्त खोली तयार केली आहे, त्यात बेड्या, पायाला जखडणाऱ्या साखळ्या आणि लाठ्या यासारखी साधने ठेवण्यात आली आहेत.
अशाप्रकारच्या तुरुंग शैलीच्या बारची निर्मिती शान्दोंग प्रांतातील किंगदाओ, झेजियांग प्रांतातील हांग्जो तसेच दक्षिण-पश्चिम चीनच्या चोंगकिंगमध्ये करण्यात आली आहे. बार सर्वसाधारणपणे कॉकटेल, सोडा वॉटर आणि कॉफी यासारख्या पेयपदार्थांसाठी ग्राहकांकडून जवळपास 50 युआनचे शुल्क घेतात.
कैद्याचा पोशाखा
जेल थीमयुक्त काही बारमध्ये ग्राहकांना सिग्नेचर ऑरेंज जंपसूट भाडेतत्वावर मिळविण्याची सुविधाही दिली जाते. याकरता ग्राहकाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागतात. बारमध्ये प्रवेश केल्यास ग्राहकांकडून एक ‘एकनॉलेजमेंट लेटर’वर स्वाक्षरी करविली जाते आणि त्यांना एक गुन्हेगारी डोजियर दिले जाते, ज्यात त्यांनी काय गुन्हे केले आहेत हे दर्शविले जाते. ग्राहकांना कोठडीत नेण्यापूर्वी त्यांचा एक मगशॉट फोटो काढला जातो. तुरुंगाचा गणवेश परिधान केलेला बार स्टाफ देखील कैद्यांशी बोलून कोणता गुन्हा केला असे विचारतात आणि तुरुंगाच्या नियमांची आठवण करून देतात. जेलथीमच्या या बारची चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. सोशल मीडियावर लोक अशा बारमध्ये जाण्याविषयी स्वत:चे अनुभव शेअर करत आहेत.









