बसवजयंतीनिमित्त डॉ. महांतप्रभू स्वामीजींचे कैद्यांना मार्गदर्शन
बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात बसवजयंतीनिमित्त कैद्यांचे मनपरिवर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बसवजयंती उत्सव मध्यवर्ती समिती व कारागृह प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शेगुणशी विरक्त मठाचे डॉ. महांतप्रभू स्वामीजी यांनी मार्गदर्शन केले. अखिल भारत वीरशैव लिंगायत महासभा अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद, सचिव भालचंद्र बागी, सोमलिंग माविनकट्टी आदी यावेळी उपस्थित होते. कारागृहाचे प्रभारी मुख्य अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात दीपप्रज्वलित करून व बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी डॉ. महांतप्रभू स्वामीजी म्हणाले, गतकाळाची चिंता करू नये, भविष्य उत्तम बनविण्यासाठी रुपरेषा आखावी, द्वेष, असुया, राग यापासून दूर राहावे, प्रत्येकाने सहनशीलता व शांततेचे गुण अंगी बाणवावेत, कारागृहातील जीवन म्हणजे टेस्ट क्रिकेटच्या सामन्यासारखे आहे. पहिल्या इनिंगमध्ये व्यवस्थित खेळला नाहीत तर दुसऱ्यांदा खेळण्याची संधी मिळते. कारागृहवासियांनी येथून बाहेर पडल्यानंतर अत्युत्तम जीवन जगण्यासाठी सकारात्मक मानसिक बदल घडवून आणावा. योग, ध्यान, प्रार्थना आदीबरोबरच चांगले कार्य करून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. यावेळी कैद्यांना फळांचे वाटप करण्यात आले. व्यासपीठावर बसनगौडा पाटील, साहाय्यक अधीक्षक मल्लिकार्जुन कोण्णूर, जेलर राजेश धर्मट्टी, बसवराज बजंत्री, आर. बी. कांबळे आदी उपस्थित होते. शशिकांत यादगुडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









