साहित्य अकादमीचे अध्यक्ष मुकुंदराज यांचे कैद्यांना मार्गदर्शन
बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी साहित्यावर आधारित चर्चासत्र व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक साहित्य अकादमी, हिंडलगा मध्यवर्ती कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन साहित्य अकादमीचे अध्यक्ष एल. एन. मुकुंदराज यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, डॉ. सर्जू काटकर आदी उपस्थित होते. कारागृहाचे प्रभारी मुख्य अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संवाद कार्यक्रमाचे दीपप्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना एल. एन. मुकुंदराज म्हणाले, 102 वर्षांचा इतिहास या कारागृहाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, द. रा. बेंद्रे, बसवराज कट्टीमनी यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी याच कारागृहात कारावास भोगला आहे.
कारागृहवासियांची साहित्याकडे ओढ निर्माण व्हावी, ज्ञानसंपादनाची आस निर्माण व्हावी, कारागृहातून सुटका झाल्यानंतर उत्तम नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरणादायी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कारागृह म्हणजे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण नाही, ते परिवर्तन घडविण्याचे ठिकाण आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी एकदा झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, एखाद्या अप्रिय घटनेमुळे तुम्ही कारागृहात आला आहात. वेळेचा सदुपयोग करून वाचन, लिखाण, योग, ध्यान व सकारात्मक विचार करण्यात स्वत:ला गुंतवून घ्यावे. कारागृहातून सुटका झाल्यानंतर उत्तम नागरिक म्हणून जीवन जगावे. डॉ. सर्जू काटकर म्हणाले,
अचानक घडलेल्या गुन्हेगारी घटनेमुळे तुम्ही कारागृहात आला आहात. प्रत्येकाची एक दिवस सुटका होणारच आहे. भूतकाळाची चिंता न करता भविष्याची रुपरेषा ठरवावी. साहित्यामध्ये दानवाला मानव बनविण्याची शक्ती आहे, म्हणून साहित्य वाचन करावे. यावेळी राघवेंद्र पुजार, अरुणकुमार लमाणी, महांतेश होंगल व प्रियांका यांनी कविता वाचन केले. व्यासपीठावर कारागृहाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, साहाय्यक अधीक्षक मल्लिकार्जुन कोण्णूर, जेलर राजेश धर्मट्टी, बसवराज बजंत्री, रमेश कांबळे, एफ. टी. दंडयण्णावर आदी उपस्थित होते. याप्रसंगी गणेश अमीनगड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मैत्रेणी गदग्याप्पगौडर यांनी स्वागत केले. एस. एस. यादगुडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









