पैसे द्या सुखसोयी मिळवा : न्यायालयाच्या आदेशानंतरही गब्बर कैद्यांची बडदास्त ठेवणे सुरूच : कारागृह विभागाचा कारभार चव्हाट्यावर
बेळगाव : बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहात विकृत उमेश रेड्डीसह अनेक गुन्हेगारांना सुखसोयी पुरविल्यासंबंधीचे व्हिडिओ खासगी वाहिन्यांमध्ये प्रसारित करण्यात आले आहेत. त्यामुळे कारागृह विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. सध्या ठळक चर्चेत असलेला उमेश रेड्डी दोन वर्षांपूर्वीच हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात होता. त्यावेळीही आपल्या कारनाम्याने तो नेहमी प्रकाशझोतात असायचा. खासकरून महिलांना टार्गेट करून गुन्हे करणाऱ्या उमेश रेड्डीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तब्बल 20 खून व बलात्कार प्रकरणात त्याच्यावर कारवाई झाली होती. अकरा प्रकरणात सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका झाली आहे. तर 9 प्रकरणात त्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. ज्यावेळी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, त्यावेळी उमेश रेड्डीला हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले.
26 ऑक्टोबर 2006 रोजी उमेश रेड्डीला हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळल्यानंतर त्याला फाशी देण्यासाठी तयारी करण्यात आली होती. फाशीचा सरावही झाला होता. त्यावेळी जिवाच्या आकांताने विकृत उमेश रेड्डी पार घाबरला होता. सध्या कारागृह विभागाचे डीआयजी असणारे टी. पी. शेष हे त्यावेळी कारागृहाचे मुख्य अधीक्षक होते. उमेश रेड्डीच्या वजनाइतकी वाळू पोत्यात भरून त्याद्वारे फाशी देण्याची तालीम करण्यात आली होती. फाशीची अंमलबजावणी होणारच अशी स्थिती असताना 200 पानांच्या वहीत ओम नम: शिवाय लिहून तो देवाला साकडे घालत होता, ‘देवा, माझी फाशी रद्द कर’. कारागृहातील हनुमान मंदिरात तो नेहमी जायचा. बेळगावात असताना उमेश रेड्डी मोबाईल वापरायचा. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातही त्याची बडदास्त ठेवण्यात आली होती.
4 नोव्हेंबर 2022 रोजी उमेश रेड्डीची फाशी रद्द करून त्याला 30 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर 3 जून 2023 रोजी त्याला बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहात हलविण्यात आले. सध्या त्याच्यामागे वृद्ध आई आहे. आईसाठी आपल्याला परप्पन अग्रहार कारागृहात हलवावे, अशी त्याची मागणी होती. न्यायालयाने फाशी रद्द केल्यामुळे त्याला बेंगळूरला हलविण्यात आले. परप्पन अग्रहार कारागृहात चित्रपट अभिनेते दर्शन व त्याच्या साथीदारांची बडदास्त ठेवल्यासंबंधीची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर स्वत: सर्वोच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनावर ताशेरे ओढले होते. त्यानंतरही कैद्यांची बडदास्त ठेवण्याचे प्रकार सुरूच आहेत. कुख्यात उमेश रेड्डीच्या कोठडीत कलर टीव्ही, मोबाईल पुरविल्याचे उघडकीस आले आहे. उमेश रेड्डीबरोबरच सोनेतस्करी प्रकरणातील तरुण राज, अल कायदाचा हस्तक जुहाद हमीद शकील मुन्ना यांचीही बडदास्त ठेवल्याचे उघडकीस आले आहे.
परप्पन अग्रहार कारागृहातील प्रकार व्हिडिओमुळे उघडकीस आले आहेत. यापूर्वी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातही असे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. एखाद्या प्रकारानंतर संबंधित कैद्यावर एफआयआर दाखल करण्यात येतो. पोलीस दलाकडून कारागृहाची तपासणी केली जाते. प्रत्यक्षात तपास यंत्रणेच्या हाती काहीच लागत नाही. कारागृह यंत्रणा पूर्णपणे सुखसोयीसाठी भरपूर पैसे खर्च करण्याची तयारी असणाऱ्या कैद्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळेच कारागृह सुखसोयींनीयुक्त आहेत. बेळगाव पोलिसांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहावर यापूर्वीही अनेक वेळा छापे टाकले आहेत. छोट्यामोठ्या वस्तू वगळता महत्त्वाचे असे काहीच तपासणीत सापडत नाही. याचा अर्थ कारागृहात काहीच नाही, असा होत नाही. छापे टाकण्यासाठी येणारे पोलीस कारागृहाच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर त्यांची तपासणी केली जाते. तपासणी होईपर्यंत ‘सर्चिंग सुरू आहे’ असा संदेश कारागृहातील विविध बराकीत पोहोचलेला असतो. मोबाईल, गांजा, विडी, तंबाखू, शेगडी, पाणी तापवण्यासाठीच्या कॉईल आदी वस्तू कुठे लपवायच्या तेथे लपवलेल्या असतात. यासाठी कारागृहातील अधिकारीच कैद्यांना मदत करतात.
कारागृहात अधिकाऱ्यांमध्ये दोन गट
कैद्यांची बडदास्त ठेवण्यावरून सध्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात अधिकाऱ्यांमध्ये दोन गट तयार झाले आहेत. याच मुद्द्यावर मारामारीच्या घटनाही घडल्या आहेत. एकेकाळी कारागृहातून मटकाही लावला जायचा. दारू, गांजा दामदुप्पट किमतीने कैद्यांना पुरविला जातो. पैसे खर्च करण्याची ज्यांची तयारी आहे, त्यांची बडदास्त ठेवली जाते. कारागृहातील कर्मचारी व काही अधिकारीच इतर अधिकाऱ्यांकडून पुरविल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांविषयी व्हिडिओ चित्रिकरण करून ठेवलेले असते. एकदा वाद निर्माण झाला की व्हिडिओ व्हायरल केला जातो.
कारागृहात मात्र नेटवर्क सुरू
काही वेळा सोयी-सुविधा पुरविल्या नाहीत. कैदीही अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जातात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून धमकावल्याचा प्रकार घडल्यानंतर कारागृहात जामर बसविण्यात आला आहे. जामरचा त्रास हिंडलगा, विजयनगर परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. कारागृहात मात्र नेटवर्क सुरू आहे. कारागृहातील काही विभागात जामरचा उपयोग होत नाही. मोबाईल हवा असेल तर जेथे नेटवर्क येते, तेथे कैद्यांना ठेवण्यासाठी मोठी रक्कम मागितली जाते. परप्पन अग्रहार कारागृहाइतकीच बेळगावातही व्यवस्था बरबटलेली आहे.









