वाहनचालक प्रशिक्षण सुरू : ग्रा. पं. मिळणार कचरावाहू वाहन : राज्यातील 5 हजार 844 ग्रा.पं.मध्ये महिलांची वर्णी
प्रतिनिधी /बेळगाव
ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत योजनेंतर्गत स्व-साहाय्य गटाचा सहभाग असणार आहे. यासाठी जिल्हा पंचायत, कॅनरा बँक आणि ग्रामीण स्वउद्योग प्रशिक्षण संस्थेचा सहभाग असणार आहे. ग्रामीण भागातील घन आणि ओला कचरा विल्हेवाट लावण्यासाठी स्व-साहाय्य गटाच्या महिलांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातही स्वच्छता वाहने दिसणार आहेत.
अलीकडे ग्रामीण भागातही कचऱयाच्या प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी शासनाने राज्यातील 5 हजार 844 ग्रा.पं. व्याप्तीमध्ये स्वच्छतेसाठी वाहने खरेदी केली आहेत. वैज्ञानिकरीत्या सुका आणि ओला कचरा वेगळा करण्यासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. शिवाय कचरावाहू वाहनावर चालक म्हणून स्व-साहाय्य गटांच्या महिलांची वर्णी लागणार आहे. त्यामुळे कचरा वाहनावर ड्रायव्हर म्हणून स्व-साहाय्य गटाच्या महिला दिसणार आहेत. यासाठी महिलांना जिल्हा पंचायतमार्फत विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणानंतर ग्रामपंचायत व्याप्तीत कचरावाहू वाहने धावणार आहेत. काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर स्व-साहाय्य गटाच्या महिलांसह कचरावाहू वाहने फिरत आहेत.
प्रकल्पासाठी 20 लाखांचा निधी
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी प्रकल्प उभारला जाणार आहे. याकरिता 20 लाख रुपयांचा निधी खर्ची घातला जाणार आहे. शिवाय दैनंदिन जमा होणारा कचरा या ठिकाणी साठवला जाणार आहे. या कचऱयातून खतनिर्मिती आणि इतर प्रकल्प राबविले जाणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी स्व-साहाय्य गटाच्या महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. कचरा आणि कचरावाहू वाहनांवर चालक म्हणून महिलाराज येणार आहे. याबाबत ग्रामीण भागातील स्व-साहाय्य गटाच्या महिलांमध्ये जागृती करून प्रशिक्षण दिले जात आहे.









