ध्वज निर्मितीत तांत्रिक चुका, नागरिकांतून नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत पोस्ट कार्यालयातून तिरंगा ध्वज विक्री केला जात आहे. परंतु, यातील बरेचसे ध्वज मार्गदर्शक सूचीप्रमाणे तयार करण्यात आलेले नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. तिरंगा ध्वज हे एक राष्ट्रीय प्रतीक असून त्याच्याशी नागरिकांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे मार्गदर्शक सूचीप्रमाणे नसणारे ध्वज पोस्ट विभागाने विक्री करू नयेत, अशी मागणी होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आझादी का अमृतमहोत्सव’निमित्त ‘हर घर तिरंगा’ हे अभियान सुरू केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर डौलाने तिरंगा फडकवावा, असे त्यांचे स्वप्न आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हे अभियान राबविले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे तसेच मोठय़ा प्रमाणात जनजागृतीही सुरू आहे.
प्रत्येक पोस्ट कार्यालयामध्ये तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एका ध्वजाची किंमत 25 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून बेळगावच्या कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात ध्वजाची विक्री केली जात आहे. परंतु, ध्वज खरेदी केल्यानंतर बरेचसे ध्वज हे मार्गदर्शक सूचीप्रमाणे नसल्याचे समोर येत आहे. काही ध्वजांची शिलाई वेडीवाकडी तर अशोक चक्राची छपाई चुकीच्या जागी झालेली दिसून येत आहे.
ध्वज तपासून खरेदी करावेत
‘हर घर तिरंगा’ या अभियानासाठी लाखो ध्वजांची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात त्यातील काही ध्वजांमध्ये त्रुटी राहून जात आहेत. परंतु, खरेदी करतानाच ग्राहकाने ध्वज तपासून खरेदी करावी. आतापर्यंत 30 हजार ध्वजांची विक्री बेळगाव विभागात झाली असल्याचे नरसिंहा यांनी ‘दै. तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
– विजय नरसिंहा, पोस्ट अधीक्षक









