युजीसी’कडून विद्यापीठांना सूचना जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) विद्यापीठांना पदवी आणि तात्पुरत्या प्रमाणपत्रांवर आधार क्रमांक छापण्यास मनाई केली आहे. आता कोणत्याही विद्यार्थ्यांच्या पदवी आणि तात्पुरत्या (प्रोव्हिजनल) प्रमाणपत्रावर संबंधिताचा आधार क्रमांक छापता येणार नाही. पदवी आणि तात्पुरत्या प्रमाणपत्रांवर विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या प्रिंटला परवानगी नाही, असे युजीसीने म्हटले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) पदवी आणि तात्पुरत्या प्रमाणपत्रांवर विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक छापू नये, अशा सूचना सर्व विद्यापीठांना दिल्या आहेत. राज्य सरकारे विद्यापीठांद्वारे प्रदान केलेल्या प्रमाणपत्रांवर आणि पदवींवर आधार क्रमांक छापण्याचा विचार करत असतानाच उच्च शिक्षण नियामक संस्थेचे महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. सदर निकषांनुसार, कोणतीही संस्था विद्यार्थ्याच्या आधार क्रमांकाशी जोडलेला कोणताही डेटाबेस किंवा रेकॉर्ड सार्वजनिक करू शकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठांशी यासंबंधी पत्रव्यवहार करण्यात आला असून उच्च शिक्षण संस्थांनी युजीसीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे युजीसी सचिव मनीष जोशी यांनी बजावले आहे.
भरती किंवा प्रवेशाच्यावेळी दस्तऐवज पडताळणीसाठी विद्यापीठांनी जारी केलेल्या प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आणि पदवी प्रमाणपत्रांवर संपूर्ण आधार क्रमांक छापण्याचा विचार राज्य सरकार करत आहेत. या निर्णयामुळे त्यांना कोणत्याही भरती प्रक्रियेवेळी कागदपत्रांची पडताळणी करणे सोपे झाले असते. परंतु आता युजीसीच्या सूचनेनंतर कोणत्याही विद्यापीठाला विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक लिहिता येणार नाही. युजीसीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर या संदर्भात नोटीसदेखील जारी केली आहे.









