इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी राकेश शर्मा यांची अलीकडेच निवड करण्यात आली आहे. गेल्या 50 वर्षापासून माध्यम जगताशी संबंध जुळवून असलेल्या राकेश शर्मा यांनी वर्तमानपत्रे, विविध प्रसार माध्यमे यांच्या एकंदर वाटचालीवर प्रश्नांच्या माध्यमातून उत्तरे दिली.
अल्पपरिचय….
गेली 50 वर्षे ते पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून माध्यम संस्थांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. सध्याला ते ‘आयटीव्ही नेटवर्क’ आणि ‘गुडमॉर्निंग इंडिया मीडिया प्रायव्हेट लिमीटेड’ यांचे संचालक आहेत. गुड मॉर्निंग समूहांतर्गत ‘आज समाज, द डेली गार्डियन, द संडे गार्डियन, इंडिया न्यूज आणि बिझनेस गार्डियन’ अशा प्रसिद्ध वर्तमानपत्रांचे प्रकाशनही ते करतात.
? आपल्या स्वत:च्या कारकिर्दीबद्दल काय सांगाल? कारकिर्दीत कोणती आव्हाने पेलली?
सुरुवातीपासूनच मी माध्यमाशी जुळवून घेतलेले असून अगदी सुरुवातीला जवळपास दहा वर्षेपर्यंत ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये जबाबदारी सांभाळली. या नंतर ‘हिंदुस्थान टाईम्स’मध्येदेखील विविध पदांची जबाबदारी लिलया पार पाडली आहे. तदनंतर गेली 15 वर्षे आयटीव्ही नेटवर्क आणि गुड मॉर्निंग इंडिया मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत सलगपणे काम करत आहे. आमचा समूह पाच वर्तमानपत्रांचे प्रकाशन करतो. त्याचप्रमाणे टीव्ही क्षेत्रात 6 प्रादेशिक आणि 2 राष्ट्रीय चॅनेलचे संचालनही करतो. डिजीटल माध्यमामध्ये जवळपास तीन ते चार चॅनेलचे व्यवस्थापन करत असून यावर बऱ्यापैकी पकड प्राप्त करण्यामध्ये यश मिळाले आहे.
आमचे कुटुंब हे मूळचे उत्तर प्रदेशमधील आहे. माझा जन्म दिल्लीत झाला असून, अभ्यासक्रम व एकंदर त्यानंतर मी दिल्लीमध्येच घडलो आहे. थोड्या अवधीकरिता चंदीगडमध्ये ‘हिंदुस्थान टाईम्स’ या वर्तमानपत्राच्या प्रकाशन शुभारंभप्रसंगी आपण गेलो होतो. त्यावेळी उत्तर भारतातील त्यांच्या सर्व आवृत्यांचे कामकाज मी पाहिले होते. जवळपास 10 वर्षाचा अनुभव या क्षेत्रामध्ये चंदिगडमध्ये घेतला होता. यानंतर आतापर्यंतचा सर्व कारकिर्दीचा काळ दिल्लीतच गेला आहे.
? आपण माध्यमांशी दीर्घकाळापासून जोडलेले आहात? सध्याच्या काळात प्रिंट मीडियासमोर कोणत्या प्रकारची आव्हाने आहेत? आयएनएसच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून ही आव्हाने तुम्ही कशी पेलणार आहात?
गेल्या पाच दशकांचा विचार केल्यास प्रत्येक दशक माध्यमांसाठी नवे आव्हान घेऊन येणारे राहिले आहे. अत्यंत यशस्वीपणे सर्व आव्हाने पेलली आहेत. तंत्रज्ञानामध्ये होणारे बदल असतील किंवा टीव्ही ते डिजीटल या स्तरावर स्पर्धेचे युग असेल, सर्वच बाबतीत समर्थपणे आव्हानांना भिडलो आहे. सर्वात अवघड आव्हान होते ते अर्थातच संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाच्या काळातील. कोरोना कालावधीमध्ये वर्तमानपत्राच्या वितरणावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता. वर्तमानपत्रांना जाहिरातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलामध्ये मोठ्या प्रमाणात घट अनुभवायला मिळाली. दीर्घकाळ चाललेल्या लॉकडाऊनमुळे त्या काळात वर्तमानपत्रांची विक्रीच होत नव्हती. त्यामुळे जाहिरातीदेखील कमी झाल्या होत्या. त्या काळात न्यूज प्रिंटचा खर्च काहीसा कमी झाला. पण वर्तमानपत्र चालविण्यासाठी येणाऱ्या खर्चामध्ये कोणतीही कपात झाली नाही. दुसरीकडे महसुलाचा ओघही थंडावल्याने अनेकांची परिस्थिती बिकट झाली. परंतु अशा कठीण प्रसंगीदेखील वर्तमानपत्रांनी एकत्रित येऊन सर्व आव्हानांचा मुकाबला निकराने करत त्यातून सहीसलामतपणे वाट काढली.
? सुरुवातीला प्रिंट माध्यमाला टीव्हीशी सामना करावा लागला, नंतर डिजीटल मीडियाचे आगमन झाले आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा जमाना आला. अशा काळात प्रिंट माध्यमाचे भविष्य काय असणार आहे? न्यूज पेपर इंडस्ट्री किंवा वर्तमानपत्र उद्योग यांना कशा पद्धतीची पावले उचलावी लागणार आहेत?
प्रिंट माध्यम असो की, इलेक्ट्रॉनिक्स डिजीटल किंवा आर्टिफिशीयल इंटेलिजन्स सर्वांनाच वेळेनुसार स्वत:मध्ये बदल घडवत चांगल्या बातम्या, उपयुक्त माहिती वाचकांना करून देणे अगत्याचे असणार आहे. माध्यमे एकमेकांविरुद्ध बिलकूल नाहीत. प्रासंगिक माहितीच्या आधारे वाचकांपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत योग्य ती माहिती योग्य शब्दात पुरविण्याचे कार्य माध्यमांना करावे लागणार आहे. वाचक, प्रेक्षकांच्या आवडी निवडीनुसार आवश्यकतेनुसार आपल्या सादरीकरणामध्ये बदल करण्याची तयारीही वरील माध्यमांनी ठेवावी लागणार आहे. या अनुषंगाने स्वत:मध्ये बदल घडवत विकसित होत वाचक व प्रेक्षकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न हरघडीला करावा लागेल हे मात्र निश्चित.
कोणत्याही माहितीच्या बाबतीत मजकूरच महत्त्वाचा असतो. मग प्रिंट माध्यम असो की टीव्ही, डिजीटल अथवा आर्टिफिशयल इंटेलिजन्स. वेगळ्या माहितीच्या व बातमीच्या आधारे लोकप्रियता मिळविताना प्रसंगी विश्वसनियता बाळगणे कर्तव्याचे झाले आहे. आज विविध माध्यमांचे प्रस्थ वाढलेले असले तरी प्रिंट माध्यमांवर जास्त विश्वास दिसून येतो. वर्तमानपत्रांची संख्यादेखील वाढते आहे. कोरोनाकाळामध्ये वर्तमानपत्रांची संख्या परिणामकपणे घसरली होती, पण आता मात्र या स्थितीत आशावादी असा फरक दिसून आला आहे. वर्तमानपत्रांचा खप वेगाने वाढतो आहे. प्रसिद्धी माध्यम उद्योगसुद्धा थोडेफार आवश्यकतेनुसार बदल करत राहिला तर या उद्योगालाही भविष्यात कोणताही धोका नसेल.
? वर्तमानपत्र उद्योगाला वाढीच्या दिशेने जाण्यासाठी काय करावे लागेल? यासंदर्भात ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे का?
कोरोना काळामध्ये आम्हाला अनेक गोष्टींचे धडे मिळाले. त्या काळात जाहिराती कमी झाल्या, जाहिरातीचा महसूल बऱ्यापैकी घसरणीत राहिला. 90च्या दशकामध्ये आर्थिक क्रांती आली आणि तेव्हापासून वर्तमानपत्रांना जाहिरातींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत गेले. 90च्या दशकाच्या आधी वर्तमानपत्रांच्या कागदाच्या किंमती वाढल्या की, सहसा अंकांची किंमत वाढवली जात होती. परंतु आता मात्र महसुलामध्ये बऱ्यापैकी वाढ होत असून वर्तमानपत्र वितरणाच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवत किंमती स्थिर ठेवल्या जात आहेत.
दक्षिण पूर्व आशियात जिथे एका वर्तमानपत्राची किंमत 15 ते 20 रुपये इतकी आहे. तर याच तुलनेमध्ये आपल्या देशात मात्र यांच्या किंमती 3 ते 4 रुपये इतक्याच आहेत. यातसुद्धा 30 ते 40 टक्के कमिशन दिले जाते. या दृष्टीने पाहता वर्तमानपत्र मालकांकडे दोन ते अडीच रुपये इतकेच राहतात. वर्तमानपत्राच्या कागदाची किंमत वाढल्यामुळे सोबत इतर खर्चामध्ये वाढ झाल्याकारणाने वर्तमानपत्र उत्पादनासाठीचा खर्चदेखील प्रसंगी वाढतो. अशावेळी जाहिराती कमी झाल्या की, सर्वच वर्तमानपत्रांना नुकसानीला सामोरे जावे लागते. वर्तमानपत्रांना जाहिरात आणि किंमत या दोन माध्यमातून महसूल प्राप्त होत असतो. आतापर्यंत बहुतेक जाहिरातदार वर्तमानपत्रांना अनुदान देण्यासाठी पैसे देत आले आहेत. यातून वर्तमानपत्र कमी किंमतीत देणे शक्य होते. त्यामुळे वर्तमानपत्राचे कामकाज योग्य प्रकारे चालू राहते आणि सोबत नफाही मिळविता येतो.
परंतु आता काळ बदलला आहे. आजच्या जमान्यात वर्तमानपत्र उद्योगाला गंभीरतेने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. 70 ते 80 च्या दशकात एक कप चहाच्या किंमतीइतकी किंमत वर्तमानपत्राची होती. पण नंतर वस्तुंच्या किंमती सातत्याने वाढल्या आहेत. अशा वेळेला वर्तमानपत्रांच्या किंमती वाढविणे आवश्यक आहे. हाच सर्वात मोठा मुद्दा आहे. वर्तमानपत्र उद्योगाला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर किंमत वाढविण्याचा विचार जरुर करायला हवा.
? वर्तमानपत्रांच्या वाढत्या किंमतीबाबत आपले काय म्हणणे आहे? वर्तमानपत्रांच्या कागदाच्या आयातीवर पाच टक्के कस्टम ड्यूटी शुल्क लावले जात आहे. आयएनएस सरकारकडे याबाबत पाठपुरवठा करणार का?
इंडियन न्यूजपेपर सोसायटी नेहमीच सरकारकडे वरील मागणी करीत आली आहे. वर्तमानपत्र हा माहितीचा खजाना आहे. महत्त्वाची माहिती, बातम्या, सूचना वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेपर्यंत विनासायास पोहोचवल्या जातात. मग यावर जीएसटी आकारला आणि कस्टम ड्यूटी शुल्क लावले तरी माध्यमांचं कार्य थांबलेलं नाही. सध्याला डिजीटल माध्यमावर सबस्क्रिप्शन करता जीएसटी लावण्यासंदर्भात प्रस्ताव येत आहे. याबाबत आम्ही सरकारकडे विरोध दर्शविला आहे.
उद्योगाला 14 लाख टन वर्तमानपत्राच्या कागदाची गरज लागते. पण भारतातील मिलमध्ये 7 लाख टन कागदाचे उत्पादन होते आणि उर्वरीत 7 लाख टन कागद हा विदेशातून आयात होतो. विदेशातून कागद खरेदीवर आम्हाला 5 टक्के कस्टम ड्यूटी शुल्क भरावे लागत आहे. याचाच अर्थ एकप्रकारे माहितीवर कर लादला जात आहे. वर्तमानपत्रांची अर्थव्यवस्था सध्या बिघडलेली आहे, असे असताना अशी शुल्क आकारणी योग्य वाटत नाही. सरकारपाशी कस्टम ड्यूटी शुल्क मागे घेण्यासंदर्भात पुन्हा एकदा आगामी काळात पाठपुरावा करणार आहोत.
? कोरोनाकाळात महसूल घटला होता, पण आता परिस्थिती बदललीय. तेव्हा जाहिरात महसूल वाढविण्याच्या दृष्टीने आगामी काळात कोणती पावले उचलणार आहात?
कोरोनानंतर व्यावसायिक जाहिराती पुन्हा येऊ लागल्या आहेत. पण अद्यापही म्हणाव्या तशा कोरोनापूर्व काळापूर्वी इतक्या प्रमाणात त्या नक्कीच नाहीत. सरकारी जाहिरातींचे बजेट (तरतूद) यापूर्वी मोठे होते. पण अलीकडे हे बजेट सरकारने कमी केले आहे. या मागचे कारण मात्र समजू शकलेले नाही. तेव्हा आम्ही सरकारकडे मागच्या बजेटप्रमाणे सरकारी जाहिराती वर्तमानपत्रांना द्याव्यात, अशा प्रकारचा आग्रह करणार आहोत.
? कोरोनाच्या दरम्यान अनेक कारणांनी विविध वर्तमानपत्रे बंद पडली पण आता पुन्हा ती सुरू होणार का? आणि आयएनएस यांच्या मदतीला धावणार का?
वर्तमानपत्र बंद करणे किंवा सुरू करण्याबाबतचा अधिकार सर्वस्वी ती चालविणाऱ्या मालकांवर सोपवलेला असतो. व्यापारी हिताचा फायदा व वाचकांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन त्या दिशेने वर्तमानपत्र चालवायचे असेल तर तसा ते निर्णय स्वत:च्या हिंमतीवर तसेच आपल्या आर्थिक क्षमतेवर निश्चितच घेऊ शकतात. याबाबतीत आयएनएस काहीही करू शकत नाही, पण मदतीची अपेक्षा केली तर त्याबाबतीमध्ये जे शक्य होईल ते करण्यासाठी आयएनएसचा प्रयत्न असेल.
? आजच्या जमान्यामध्ये ई-पेपर उपलब्ध होत असून ऑनलाईन फॉरमॅटवर वर्तमानपत्राची पीडीएफ पाने सादर केली जात आहेत, तिही मोफत. हीच पाने पुढे व्हॉटस्अॅप व टेलीग्राम समूहावर पाठविली जातात. यामुळे वर्तमानपत्रे आणि ई-पेपर यांच्या सबस्क्रिप्शन महसुलात घट होते. यावर आपले काय म्हणणे आहे?
एक लक्षात घ्या, यामुळे वर्तमानपत्रावर कोणताही परिणाम होणार नाही. माझ्यामते ज्यांना वर्तमानपत्रे हातात घेऊन वाचण्याची सवय आहे, ते ई-पेपरला कधीच प्राधान्य देणार नाहीत. वर्तमानपत्रे ही भविष्यात चालूच राहणार आहेत. वर्तमानपत्र हातात घेऊन वाचताना वाचण्याचा आनंद घेताना पसंतीच्या बातम्या कापून ठेवत त्यांचा संग्रह करत आनंद घेणारेही आजच्या जमान्यात भरपूरजण आहेत. अशा वेळी वर्तमानपत्रांचे भविष्य संकटात नाही हे लक्षात ठेवावे? काही लोकांकडून वर्तमानपत्रांच्या पानांची पीडीएफ बनवून एकमेकांना पाठविली जात असली तरी यांचा वर्तमानपत्रावर कोणताही परिणाम संभवत नाही.
राकेश शर्मा, अध्यक्ष, इंडियन न्यूज पेपर सोसायटी








