कोल्हापूर प्रतिनिधी
संस्थाचालकांनी महिन्यातून एकदा शाळेत जावून बैठक घेतली पाहिजे. नाहीतर संस्था कधी बळकावली जाते हेदेखील कळत नाही. त्यामुळे संस्थाचालकांनी वार्षिक सर्वसाधारण सभा घेवून कागदोपत्री चेंज रिपोर्ट दरवर्षी अपडेट केला पाहिजे, असे आवाहन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. राम गणेश गडकरी हॉलमध्ये झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख होते.
आमदार आसगावकर म्हणाले, संस्थाचालकांनी आरटीई फाईलला शिक्षणाधिकाऱ्यांची मंजुरी घेवून वेतनेत्तर अनुदान घ्यावे. कर्मचारी आणि संस्थाचालकांचा वाद मिटवण्याचे काम आम्ही कायमच करतो, परंतू संस्थाचालकांनीही वेळेवर पदोन्नत्ती दिली पाहिजे. संस्थाचालक म्हणून न राहता, विश्वस्त म्हणून काम केल्यास शाळेची प्रगती होते. तसेच मुख्याध्यापक किंवा लिपिकावर अवलंबून न राहता संस्थाचालकांनी शाळेकडे स्वत: लक्ष देत, कर्मचाऱ्यांशी सुसंवाद ठेवला पाहिजे. आमदार म्हणून मी सर्व शाळेला दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर झाला पाहिजे. शाळांचे पेव फुटले असल्याने मास्टर प्लॅन तयार करून नवीन शाळांना शासनाने मंजूरी दिली पाहिजे. तसेच शाळेची गुणवत्ता वाढल्यास विद्यार्थी संख्या आपोआप वाढते.
\
माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर म्हणाले, शाळांनी जिल्हा परिषदेला समायोजनाची माहिती दिल्याशिवाय वेतन आदा करणार नाही. रिक्त जागांची आणि वादातील जागांची माहिती कळवणे आवश्यक आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू झाली असून, संस्थांनी पुणे मावकाकडून रोस्टर तपासणी व बिंदू नामावली करून पवित्र पोर्टलवर रिक्त जागांची माहिती भरावी. आरटीईचे निकष पूर्ण केल्याचा दाखलाही आवश्यक आहे. संस्था आणि कर्मचाऱ्यांचे वाद स्थानिक पातळीवर मिटवावे. संस्थेने वेळेत पदोन्नत्ती आणि सेवानिवृत्ती वेतनासह सीआर भरणे आवश्यक आहे. वेळेत सीआर भरल्यास राज्य व देशपातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार कोल्हापुरला मिळेल. अॅङ अमित बाडकर म्हणाले, संस्थांनी वेळेत लेखापरीक्षण करून घेतले पाहिजे. तसेच संस्थाचालकांना शाळेच्या इमारती बांधकामाचा ठेका नातेवाईकांना देता येणार नाही. शासनाने ऑडीट रिपोर्ट ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच संस्थाचालकांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे.
अध्यक्षस्थानावरून वसंतराव देशमुख म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात टिकूण राहण्यासाठी शाळांनी प्रगती केली पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषदेने शाळांची तपासणी करून सूचना द्याव्यात. अन्यथा इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समूह होईल आणि आपण अडचणीत येईल. प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांनी स्वागत केले. आभार एन. आर. भोसले यांनी मानले. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, जयवंत शिंपी, सतीश घाळी, बी. जी. बोराडे, एस. डी. लाड, खंडेराव जगदाळे, सुरेश पाटील, पुंडलीकराव जाधव, मदनराव कारंडे, श्रीराम साळोखे, एन. आर. भोसले, बाबासो पाटील, दादासाहेब लाड, सुरेश संकपाळ आदी उपस्थित होते.