सायंकाळी 4 पर्यंत शिक्षक ताटकळत : 40 शिक्षकांचे कौन्सिलिंग पूर्ण
बेळगाव : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचे कौन्सिलिंग शनिवारी पार पडले. परंतु, बेवसाईट सुरू न झाल्याने सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत शिक्षक ताटकळत होते. सर्व्हर सुरू होत नसल्याने दिवसभर शिक्षकांची गैरसोय झाली. यामुळे काही शिक्षकांनी आपली नाराजी शिक्षणाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. परंतु, संपूर्ण राज्यातच सर्व्हरची समस्या निर्माण झाल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी हतबलता व्यक्त केली. शहरासह ग्रामीण भागातील रिक्त जागांसाठी मुख्याध्यापकांचे कौन्सिलिंग आयोजित करण्यात आले होते. शिक्षण विभागाने अ, ब, क या प्रतवारीनुसार शाळांचे वर्गीकरण केले आहे. शहरी भागातील शाळा अ, जेथे वाहतुकीची सुविधा आहे त्या शाळा ब व दुर्गम भागातील शाळांना क अशी वर्गवारी करण्यात आली आहे. क प्रवर्गातील शिक्षकांना ब मध्ये व ब प्रवर्गातील शिक्षकांना अ प्रवर्गात बदली मिळावी यासाठी शनिवारी कौन्सिलिंग होणार होते. सकाळी 10 वाजल्यापासूनच क्लब रोड येथील जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात बेळगाव विभागातील मुख्याध्यापकांनी गर्दी केली होती. मराठी, कन्नड व ऊर्दू माध्यमाचे मुख्याध्यापक कौन्सिलिंगसाठी हजर होते. परंतु, राज्य सरकारने निश्चित केलेली वेबसाईट सुरू होत नसल्याने कौन्सिलिंग प्रक्रिया थांबविण्यात आली होती. कौन्सिलिंग प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक दोष असल्यामुळे ते दूर करण्यासाठी बेंगळूर येथून वेबसाईट काहीकाळासाठी बंद करण्यात आल्याची माहिती शिक्षकांना देण्यात आली. यामुळे ताटकळत बसलेल्या शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
40 मुख्याध्यापकांच्या कौन्सिलिंगची प्रक्रिया पूर्ण
सायंकाळी 4 नंतर वेबसाईट सुरू झाल्याने कौन्सिलिंग प्रक्रियेला सुरुवात झाली. 3 शिक्षकांचे डबल प्रमोशन तर 37 शिक्षकांचे सिंगल प्रमोशन या पद्धतीने कौन्सिलिंग करण्यात आले. एकूण 40 मुख्याध्यापकांचे शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत कौन्सिलिंग घेण्यात आले. सर्व्हर उशिराने सुरू झाला असला तरी कौन्सिलिंगची प्रक्रिया शिक्षणाधिकाऱ्यांनी पूर्ण केली. जिल्हाशिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांसह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कौन्सिलिंगची प्रक्रिया पार पडली.









