हिरेकोडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेतील 119 मुले अन्न विषबाधेने त्रस्त
प्रतिनिधी/ बेळगाव
हिरेकोडी, ता. चिकोडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेतील 119 मुले अन्न विषबाधेने त्रस्त आहेत. जिल्हा प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून निवासी शाळेच्या प्राचार्या व वॉर्डन या दोघा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबरोबरच ही घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी करण्यासाठी पाणी व इतर नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
बेंगळूर येथील अल्पसंख्याक विभागाचे संचालक जिलानी मोकाशी यांनी प्राचार्या कुमारी लता व वॉर्डन शिवाप्पा डुकरे या दोघा जणांना निलंबित केले आहे. यासंबंधीचे आदेश शनिवारी जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आले आहेत. जिल्हा अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
अल्पसंख्याक विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या मोरारजी देसाई निवासी शाळेत सहावी ते दहावीपर्यंतची 235 मुले, 204 मुली असे एकूण 439 विद्यार्थी राहतात. गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी निवासी शाळेत 406 विद्यार्थी हजर होते. रात्री जेवणासाठी भातआमटी, काकडीची भाजी, चपाती व अंडी देण्यात आली होती. शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी अल्पोपहारासाठी मेनू चार्टप्रमाणे पोहे द्यायला हवे होते. त्यात बदल करून उप्पीट व चहा वितरित करण्यात आले आहे. या घटनेचे निश्चित कारण समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी तयार अन्न, धान्य व पाणी प्रयोगशाळेत पाठवले आहे. भाजीपाला नासलेला होता, असेही पाहणीत आढळून आले आहे. 26 ऑगस्ट 2025 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निवासी शाळेला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी स्वच्छतेवर भर देण्याची सूचना देण्याबरोबरच उत्तम दर्जाचा भाजीपाला वापरण्यास सांगितले होते. शौचालय स्वच्छ ठेवण्याचीही सूचना करण्यात आली होती. या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्राचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम अन्न पुरवण्यास असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवत व स्वच्छता राखण्यात असमर्थ ठरल्याचा आरोप करीत वॉर्डनवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबरोबरच जिल्हा सर्वेक्षण अधिकाऱ्यांनीही या घटनेसंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 119 पैकी 38 मुले पूर्णपणे बरी होईन डिस्चार्ज झाली आहेत. 71 मुलांचे आरोग्य स्थिर आहे. पाण्याचे तीन नमुने, अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती दिली आहे.
अन्न विषबाधेने त्रस्त मुलांच्या उपचारासाठी पाच बालरोगतज्ञ, 10 वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व डी ग्रुप कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आले आहे. गरज भासल्यास या मुलांवर पुढील उपचारासाठी इतर इस्पितळांना हलवण्यासाठी पाच रुग्णवाहिका व कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. चिकोडी येथील सरकारी इस्पितळात 35 मुले उपचार घेत आहेत. चिकोडी येथील आई व मुलांच्या इस्पितळात 21, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 15 व खासगी इस्पितळात 10 मुलांवर उपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.









