मुलाच्या फायद्यासाठी बदलले नियम उत्तरपत्रिकेत फेरफार, गुणांत केली वाढ ग्रंथपाल आनंद साळवेही निलंबित
प्रतिनिधी / मडगाव
मडगावच्या विद्या विकास मंडळाच्या कारे कायदा महाविद्यालयातील प्रथम वर्ष बीए एलएलबी प्रवेश घोटाळ्यात दोषी ठरल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साबा दा सिल्वा यांना तसेच महाविद्यालयाचे ग्रंथपाल आनंद साळवे यांनाही मंडळाने काल गुऊवारी सेवेतून निलंबित केले आहे.
या घोटाळ्याची तपासणी करण्यासाठी गोवा विद्यापीठाने 9 सदस्यांची समिती नेमली होती. या समितीच्या अहवालाप्रमाणे प्राचार्य डॉ. साबा दा सिल्वा पूर्णपणे दोषी ठरले आहेत.
प्राचार्य सिल्वा यांनी आपल्या मुलाच्या फायद्यासाठी केलेल्या कृत्याची गंभीर दखल तपासणी समितीने घेतली आहे. समितीने आपला अहवाल गोवा विद्यापीठाला सादर केल्यानंतर वरील दोघांवरही शिस्तभंगाची कारवाई करावी आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करावे, असे स्पष्ट निर्देश व्यवस्थापनाला बुधवारी दिले होते. त्याप्रमाणे, बुधवारी संध्याकाळीच त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला होता.
प्रवेश परीक्षेच्या गुणांबाबत एकतर्फी निर्णय
प्राचार्य साबा दा सिल्वा यांच्या मुलाला बारावीच्या परीक्षेत 60 टक्के गुण मिळाले होते. बीए एलएलबी प्रवेश मिळणे सुकर व्हावे यासाठी विद्यापीठाला अंधारात ठेवून सिल्वा यांनी प्रवेश पद्धती बदलताना बारावीच्या परीक्षेत मिळालेले गुण विचारात न घेता फक्त प्रवेश परीक्षेचे गुणच विचारात घेऊन प्रवेश देण्याचा एकतर्फी निर्णय घेतला.
स्वत:च्या मर्जीतील प्रश्नांचा केला समावेश
बीए एलएलबी प्रवेश परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सिल्वा यांनी स्वत:च बदलून आपल्याला हवे असलेल्या, मुलाला सोपे असणाऱ्या प्रश्नांचा त्यात समावेश केला होता.
मुलाच्या उत्तरपत्रिकेत फेरफार, गुणांतही वाढ
प्राचार्य साबा दा सिल्वा एवढे करुनच थांबले नाहीत, तर त्यांनी शेवटच्या क्षणी आपल्या पुत्राच्या उत्तर पत्रिकेच्या गुणांतही फेरफार केला, असे विद्यापीठाच्या चौकशीत पुढे आले आहे.
गोवा विद्यापीठाने रद्द केली प्रवेशप्रक्रिया
गोवा विद्यापीठाने 25 जुलै रोजी अधिसूचना जारी करून जी-सीएलएटी 2023 नुसार कायदा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना दिलेला प्रवेश मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
एका विद्यार्थ्यामुळे सर्व विद्यार्थ्यांवर अन्याय का?
प्राचार्य सिल्वा यांचा मुलगा असलेल्या एका विद्यार्थ्यामुळे इतर सर्व विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याने मिरामार येथील साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात गोवा विद्यापीठाच्या निर्णयास आव्हान दिले. गोवा विद्यापीठाने तो निर्णय तूर्त ‘जैसे थे’ ठेवून पुढील सुनावणीपर्यंत त्यावरील काढण्यात येणाऱ्या तोडग्याची माहिती दिली जाईल, असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिले होते. आता गोवा विद्यापीठ कोणता तोडगा काढणार, याकडे बीए एलएलबीसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.









