गोळीबारानंतर महाविद्यालयातून पोबारा
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशातील छतरपूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी दोन विद्यार्थ्यांनी भरदिवसा सरकारी शाळेत घुसून प्राचार्यांवर गोळ्या झाडल्या. प्राचार्यांची स्वच्छतागृहामध्ये हत्या केल्यानंतर दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात विद्यार्थ्याची छायाचित्रे कैद झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणती शाळेतील कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. ही घटना धामोरा शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राचार्य सुरेंद्रकुमार सक्सेना हे धामोरा शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात 4-5 वर्षांपासून कार्यरत होते. शुक्रवारी 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांनी शाळेत घुसून प्राचार्यांवर गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर दोन्ही विद्यार्थी फरार झाले. माहिती मिळताच एफएसएल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मुख्याध्यापकांची स्कूटर गायब असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. बहुधा आरोपी स्कूटरसह पळून गेल्याचा संशय आहे. या तपासासाठी जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.









