कोपेनहेगन येथील विद्यापीठाच्या काही संशोधकांनी आदिमानवासंबंधी नवीन निष्कर्ष समोर आणला आहे. त्यांच्या संशोधनानुसार आदिमानवाची होमो हिडलबर्गेसीस नामक प्रजाती 40 हजार वर्षांपूर्वीच लोप पावली आहे. आतापर्यंतच्या समजुतीनुसार ती 20 हजार वर्षांपूर्वी लोप पावली होती. या आदिमानवाला पेट्रा असेही संबोधले जाते. 1856 मध्ये याचे अवशेष प्रथम सापडले होते. याच्याबद्दल आजही अनेक रहस्ये टिकून आहेत.

आदिमानवाला मानवी संस्कृतीची नांदी मानले जाते. आधुनिक काळातील मानवाची संस्कृती, सामाजिक मानदंड आणि विज्ञान यांची मूळे कुठे ना कुठे या आदिमानवी समाजामध्ये होती, असे स्पष्टपणे दिसून येते. आदिमानवांच्या व्यवहारांमध्येच उत्क्रांती घडत घडत आजच्या आधुनिक मानवाचे क्रियाकलाप विकसित झाले आहेत. परिणामी हा आदिमानव आजच्या प्रगत मानवाचा पूर्वज आहे असे संशोधनाअंती दिसून आले आहे. हे आदिमानव कसे विलुप्त झाले, हे एक कोडेच आहे. त्यांचे डीएनएही मिळत नाहीत. त्यामुळे अधिक संशोधन कठीण बनले आहे. हा आदिमानव भूमध्य समुद्र ते सायबेरिया या मोठय़ा सपाट क्षेत्रावर एकेकाळी अस्तित्वात होता. नैसर्गिक कारणांमुळे हा अधिवास अननुकूल ठरल्यामुळे ही प्रजाती विलुप्त झाली असावी, असे मानले जाते. तथापि, याचा ठोस पुरावा न मिळाल्याने अधिक संशोधन होत आहे. आजचा प्रगत मानव (होमो सेपियन) हा या प्रजातीचा स्पर्धक असावा, असेही मत व्यक्त होत आहे. ही प्रजाती अद्याप टिकून असती तर पृथ्वीवर शहाण्या मानवाच्या दोन प्रजाती एकाचवेळी अस्तित्वात असलेल्या पहावयास मिळाल्या असत्या. कदाचित होमो सेपियन्सनीच या प्रजातीला संपविले असावे, असेही मत व्यक्त होत आहे. तथापि, या मताला बहुतेक संशोधकांची संमती नाही. ही प्रजाती होमो सेपियन्समध्ये पूर्णतः मिसळून गेली असावी, असे मानणाऱयांचा वर्ग पुरातत्व शास्त्रज्ञांमध्ये मोठा आहे.









