वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रुपे पुरस्कृत दुसऱया प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेला 4 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. ही लीग स्पर्धा देशातील तीन विविध शहरांमध्ये घेतली जाणार असून बेंगळूर, हैद्राबाद आणि कोची या शहरांचा समावेश आहे.
सदर स्पर्धेमध्ये आठ विविध संघांचा सहभाग राहील. कालिकत हिरोज, कोची ब्ल्यू स्पायकर्स, अहमदाबाद डिफेंडर्स, हैद्राबाद ब्लॅकहॉक्स, चेन्नई ब्लिझ, बेंगळूर टॉर्पेडोज, मुंबई मेट्रोज आणि कोलकाता थंडरबोल्ट्स हे संघ आहेत. सदर स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जाणार असून आघाडीचे चार संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेतील अंतिम सामना कोचीमध्ये होईल. या स्पर्धेत एकूण 31 सामने होणार असून या सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. यापूर्वी भारतातील पहिली प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी झाल्याने यावेळी या स्पर्धेला अधिक प्रतिसाद मिळेल, अशी आशा स्पर्धा आयोजकांनी व्यक्त केली आहे.









