पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बुधवारी मध्य प्रदेशमधील कार्यक्रमात एका बाजूने पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आणि दुसऱ्या बाजूने अमेरिकेलाही ठणकावून बजावले. ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताने जे यश मिळवले, त्यातून भारताचा आत्मविश्वास आणखी वाढलेला आहे. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख पंतप्रधानांनी मध्य प्रदेशातील जाहीर सभेत केला आणि भारत आता दहशतवाद्यांच्या अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरत नाही. दहशतवादाची कारवाई पुन्हा सुरू केल्यास घरात घुसून मारण्याची ताकद आम्ही ठेवतो आहोत, असा खणखणीत इशारा दिला. भारताचा एकंदरीत जो विकास गेल्या काही वर्षांमध्ये झालेला आहे त्यातून अमेरिकेला त्रास होऊ लागला, हे साहजिकच आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याच्या मार्गावर होते. पण दोन्ही देशांच्या दरम्यान जी चर्चा झाली त्यातून दोघांनीही शस्त्रs खाली ठेवण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश आहे, असे जेव्हा अमेरिका भारताला सांगते तेव्हा, त्याचाच अर्थ अमेरिका भारताला धमकी देऊ पाहत होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेलाही त्याच वेळी इशारा दिला होता. तसेच आम्हाला द्विपक्षीय वार्ता चालू शकते, पण तिसऱ्या देशाने भारताच्या कारभारात डोकावू नये, असे भारताने यापूर्वी देखील अमेरिकेला सांगितले आहे. मात्र भारत-पाक शस्त्रसंधीचा लाभ घेऊ पाहणाऱ्या अमेरिकेला भारताने कोणताही प्रतिसाद दिला नाही, हे अमेरिकेला आतापर्यंतचे सर्वात मोठे लागणारे शल्य होते आणि त्यामुळेच अमेरिकेने भारतावर विविध प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कणखर भूमिकेतून अमेरिकेची डाळ शिजू दिली नाही. परिणामी भारतावर आर्थिक निर्बंध आणण्यासाठी अमेरिकेने अनेक प्रयत्न केले आणि भारतावर 50 टक्के कर लागू केला. त्यातूनही भारताचे काहीही बिघडले नाही. यातून अमेरिकेचा नैतिक पराभव झाला. परिणामी अमेरिकेला आपल्या निर्णयांमध्ये आता माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. हा भारताचा नैतिक विजय आणि अमेरिकेसाठी फार मोठा धक्का ठरतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केलेल्या आपल्या भाषणातून मातृभूमीच्या सुरक्षेपेक्षा मोठं आमच्यासाठी काहीही नाही, असे सांगतानाच पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आमच्या भारतीय बहिणी आणि मुलींच्या कपाळावरील सिंदूर पुसला. त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही ऑपरेशन सिंधूर राबवले आणि त्यातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आपल्या शूर जवानांनी पाकिस्तानला एवढा कायमस्वरूपी धडा शिकविला की पाकिस्तानला शरणागती पत्करणे भाग पडले. एवढे दिवस पाकिस्तान चुकीची माहिती देत होता. परंतु पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी, भारताने त्यांचे जे हाल केले त्याची रडकथा वृत्तवाहिनींवरुन जाहीर केली हाच मोठा पुरावा ठरलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या भारतातील काही राजकीय नेत्यांना देखील आता तरी सत्य समजले असावे असे वाटते. पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर भारतीय हवाई दलाने जो मोठा हल्ला केला तो त्यांनी मान्य केलेला आहे. स्वत: त्यांच्या कमांडरने सांगितले की या हल्ल्यात मुख्य सूत्रधार मसूद अजहरचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. आता पाकिस्तान सरकार स्वत: खर्च करून या जैश ए मोहम्मदचे मुख्यालय पुन्हा उभारू पाहतेय, याचाच अर्थ पाकिस्तान थेट आणि प्रत्यक्ष आजही दहशतवादी संघटनांना पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा देत आहे. खरे तर गेल्या दोन दिवसात पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात कित्येकजण मरण पावले, असे असताना देखील पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांना खतपाणी घालते, यातून पाकिस्तान ‘सुंभ जळला तरी पीळ जात नाही’ याच पठडीतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांना प्रोत्साहन दिले आणि त्यांना गौरविले यातून भारतीय सैनिकांचा कणा आणखी ताठ होऊन जाईल. भारतावर वाकडी नजर ठेवणाऱ्या केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर, अन्य देशांना देखील भारताने चांगलाच दम दिलेला आहे. भारत आपली सुरक्षा नैतिकतेच्या बळावर आणखी मजबूत करू शकतो. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर केलेले प्रचंड मोठे हल्ले यातून साऱ्या जगाला भारताने ‘आम्ही गप्प राहिलेलो नाही आहोत, आम्ही आमची ताकद दाखवू शकतो’ असा गर्भित इशारा दिलेला आहे. केवळ मोदींसारखे कणखर नेतृत्व असेल तरच हे शक्य आहे. यापूर्वी पाकिस्तानने अनेकवेळा भारतावर चाल करण्याचा प्रयत्न केला. हजारो निरपराधी भारतीयांचे बळी घेतले, परंतु आता भारताने आपले करारी धोरण पाकिस्तानला दाखवून दिलेच, त्याचबरोबर याच कारवाईतून इतर देशांना देखील भारत किती कणखर आहे हे दाखवून दिलेले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी दहशतवादी हे भारताकडे फिरकू देखील शकत नाही. जे दहशतवादी भारतात पोहोचतील ते समूळ नष्ट होतील, असा इशारा भारताने दिलेला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील थार येथे बुधवारी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात केलेले भाषण हा संपूर्ण जगासाठी इशारा आहे. आम्ही शांत आहोत परंतु आमच्या शांततेचा कोणी गैरफायदा उठवला तर त्यांची पळता भुई थोडी होईल, हे अस्त्र मोदींनी अवघ्या जगाला दाखवून दिलेले आहे. ह्याच नैतिकतेच्या आधारावर भारताच्या सैनिकांना मिळालेले बळ हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. एवढी वर्षे भारताने दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी असंख्य प्रयत्न केले. प्रचंड खर्च तर केलाच शिवाय हजारो निरपराध माणसे आपण गमावली. आता दहशतवाद्यांना भारतात प्रवेश करताना आपल्याला कायमस्वरूपी माघारी जाता येणार नाही हे लक्षात ठेवावे लागेल आणि त्यामुळेच दहशतवादी कारवाया देखील फार कमी झालेल्या आहेत हे मान्य करावे लागेल. ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताचे मनोबल धैर्य वाढविले आणि त्याचबरोबर भारतीय सैनिकांमधील मातृभूमीच्या रक्षणासाठी असलेला जोश आणखी बळावला आहे. तसेच त्यांना आता पूर्ण अधिकार देखील प्राप्त झाले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारताने कायमस्वरूपी जागतिक पातळीवर आपले स्थान अत्यंत मजबूत केले आणि भारत एक मजबूत, सक्षम, सशक्त शक्ती म्हणून जगात पुढे येत आहे.
Previous Articleगँगस्टर छोटा राजनचा जामीन रद्द
Next Article अनिश्चित स्थितीत निर्यात मजबूत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








