वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीचा आढावा घेतला आहे. गेल्या साधारण महिनाभर हे राज्य हिंसाचारग्रस्त बनले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली. राज्यात अद्यापही हिंसाचाराच्या घटना घडत असून केंद्रीय सुरक्षा दलांचे सैनिक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्यातील मैतेयी आणि कुकी या दोन समुदायांमध्ये प्रामुख्याने हा हिंसाचार होत आहे. मैतेयी समाजाने स्वत:चा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्याची मागणी केली आहे. मात्र या मागणीला कुकी तसेच अन्य अनुसूचित जमातींचा विरोध आहे. याच विरोधाचे पर्यवसान व्यापक हिंसेत झाले असून आतापर्यंत हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या असून 100 हून अधिक लोकांचा बळी गेला.
दंगलखोरांवर कठोर कारवाई
दंगलखोरांवर केंद्रीय सुरक्षा दलांनी केलेल्या कठोर कारवाईत गेल्या दोन दिवसांमध्ये दंगलखोरांचे 100 बंकर्स उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. त्यांना देशाबाहेरुन शस्त्रे आणि पैशाचे साहाय्य मिळत असल्याचा संशय आहे. त्यांनी सीमावर्ती प्रदेशांमध्ये हे बंकर्स उभे केले होते. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ते मोडून काढले आहेत. मात्र, या कारवाईत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.









