राष्ट्रपती मुर्मू यांनी केले सन्मानित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित मुलामुलींशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी संवाद साधला आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई यावेळी उपस्थित होते. यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी विज्ञान भवनात 11 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्काराने सन्मानित केले होते. पुरस्कारविजेत्यांमध्ये 6 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे.
दरवर्षी केंद्र सरकार मुलांना त्यांच्या असाधारण कामगिरीसाठी हा पुरस्कार देत असते. हा पुरस्कार 5-18 वयोगटातील मुलांना 6 शेणींमध्ये दिला जातो. सर्व पुरस्कारविजेत्यांनी एक पदक, 1 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र देण्यात येते. बाल पुरस्कार विजेते दरवर्षी प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होत असतात.
चालू वर्षी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी कला आणि संस्कृती क्षेत्रात असाधारण कामगिरी केलेल्या 4 मुलांची निवड करण्यात आली आहे. तर शौर्यासाठी एक मुलाची आणि नवोन्मेषासाठी 2 मुलांची निवड करण्यात आली होती. सामाजिक सेवेतील योगदानासाठी 1 तर क्रीडाक्षेत्रातील कामगिरीसाठी 3 पुरस्कार देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय बाल पुरस्कारविजेते..
नाव शेणी राज्य
आदित्य सुरेश कला-संस्कृती केरळ
आदित्यप्रताप सिंह चौहान नवोन्मेष छत्तीसगड
अनुष्का जॉली सामाजिक सेवा दिल्ली
हनाया निसार क्रीडा जम्मू-काश्मीर
कोलगतला अलाना मीनाक्षी क्रीडा आंध्रप्रदेश
एम. गौरवी रेड्डी कला-संस्कृती तेलंगणा
ऋषी शिव प्रसन्ना नवोन्मेष कर्नाटक
रोहन रामचंद्र बहिर शौर्य महाराष्ट्र
संभव मिश्रा कला-संस्कृती ओडिशा
शौर्यजीत रंजीत कुमार खैरे क्रीडा गुजरात
श्रेया भट्टाचार्य कला-संस्कृती आसाम
महाराष्ट्रातील रोहनचा गौरव
15 वर्षीय रोहन रामचंद्र बहिरचा शौर्यासाठी राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या रोहनने नदीत बुडणाऱया एका महिलेला वाचविण्यासाठी स्वतःचा जीव जोखिमीत टाकला होता. तसेच या शौर्यानंतर स्थानिक स्तरावर झालेल्या गौरवसोहळय़ात प्राप्त रक्कम त्याने गावासाठी दान केली होती.








