सिकंदराबाद-विशाखापट्टणम एक्स्प्रेस सेवेला प्रारंभ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी 10ः30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील आठव्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशला जोडणारी ही पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आहे. ही एक्स्प्रेस सिकंदराबाद ते विशाखापट्टणम दरम्यानचे 700 किलोमीटरचे अंतर अवघ्या 8 तासात कापणार आहे. ही एक्स्प्रेस आंध्रप्रदेश आणि तेलंगणाच्या प्रत्येकी 3-3 रेल्वेस्थानकांवर थांबेल. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाडा, तर तेलंगणात खम्मम, वारंगल आणि सिकंदराबाद या स्थानकांवर या एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली ते वाराणसीपर्यंत धावणाऱया पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेस टेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यापासून गेल्या दोन वर्षात अशाप्रकारच्या आठ एक्स्प्रेस देशाच्या विविध भागात सुरू करण्यात आल्या आहेत.









