सैन्याच्या शौर्यावर केंद्रीत असण्याची शक्यता : आज सायंकाळी राष्ट्रपतींचे संबोधन
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
स्वातंत्र्यदिनी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सलग बाराव्यांदा राष्ट्राला संबोधित करतील. यावेळचा हा कार्यक्रम ऐतिहासिक बनवण्याची तयारी केंद्र सरकारकडून सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान आपल्या भाषणातून आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताचे व्हिजन देतील. तसेच, संपूर्ण भाषण सैन्याच्या शौर्याला समर्पित असेल. याचदरम्यान पंतप्रधान मोदी भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी रोडमॅप देखील देऊ शकतात. तत्पूर्वी, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज सायंकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधून भाषण करणार आहेत.
स्वातंत्र्यदिनी दरवर्षी पंतप्रधान आपल्या भाषणांमध्ये देशाला दिशा देणाऱ्या मोठ्या घोषणा करतात. यापूर्वीच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यांमध्ये पंतप्रधानांनी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया अशा घोषणा देखील केल्या आहेत. त्यानंतर यंदा ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने सैन्याने दाखविलेले शौर्य पंतप्रधानांच्या भाषणाच्या केंद्रस्थानी असणार आहे. मोदी आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या नवीन रणनीतीबद्दल सांगतील. तसेच त्याचे राजनैतिक आणि राजकीय पैलू सांगतील. त्याव्यतिरिक्त सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाबद्दल देखील घोषणा होऊ शकतात. महिला कल्याण आणि किसान सन्मान निधीच्या नवीन योजनेबद्दल माहिती जाहीर करू शकतात.
पंतप्रधान मोदी जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या बाबतीत केंद्राच्या रोडमॅपची घोषणा देखील करू शकतात. जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांनी यासंदर्भात शिफारसी दिल्या आहेत. राज्याच्या पुनर्स्थापनेच्या औपचारिक घोषणेनंतर विधिमंडळ आणि कार्यकारी पातळीवर जलद पावले उचलली जाऊ शकतात. राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या विधेयकात विद्यमान विधानसभेला राज्य विधानसभा म्हणून प्रोत्साहन देण्याची तरतूद असणार आहे.









