श्रीलंकेतील आर्थिक संकट ः राष्ट्रपतींनी दिली पदाची शपथ
वृत्तसंस्था/ कोलंबो
आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. हे पद सांभाळल्यावर माझे सर्वात पहिले काम देशाला संकटातून बाहेर काढणे आहे. याकरता मी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत चर्चा करणार असल्याचे विक्रमसिंघे यांनी सांगितले आहे.
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी विक्रमसिंघे मंत्रिमंडळाचा विस्तार करत 24 मे रोजी नव्या मंत्र्यांना यात सामील केले होते, परंतु यात कुणाचीच अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली नव्हती.
आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी विक्रमसिंघे सरकारने शासकीय एअरलाइन विकण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सरकारने नव्या चलनाची छपाई करण्याचाही निर्णय घेतला आहे. 6 आठवडय़ांमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असून यात पायाभूत प्रकल्पांसाठीच्या निधीत कपात केली जाणार असल्याचे विक्रमसिंघे यांनी यापूर्वीच सांगितले आहे. 73 वर्षीय रानिल यांना देशातील सर्वात चांगला राजकीय प्रशासक आणि अमेरिकेचा समर्थक मानले जाते.
काही महिन्यांपूर्वी देशात आर्थिक संकट सुरू झाले होते आणि आता दिवाळखोर होण्याचा धोका आहे. 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून श्रीलंकेतील हे सर्वात गंभीर आर्थिक संकट असल्याचे मानण्यात येत आहे. दैनंदिन गरजेच्या सामग्रीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तर अन्नधान्य आणि इंधनाचा देशात तुटवडा निर्माण झाला आहे. या स्थितीत लोक रस्त्यांवर उतरून हिंसक निदर्शने करत आहेत.









