राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीही करणार दौरा : राज्यसभा खासदार सुधा मूर्ती पुंभमध्ये सामील
वृत्तसंस्था/ प्रयागराज
उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभममध्ये अनेक दिग्गज नेते अन् महनीय पोहोचत आहेत. महाकुंभमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानही सामील होणार आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे 1 फेब्रुवारी रोजी महाकुंभ क्षेत्री पोहोचतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 फेब्रुवारी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 10 फेब्रुवारी रोजी कुंभनगरीला भेट देणार आहेत. तर राज्यसभा खासदार सुधा मूर्ती या महाकुंभमध्ये पोहोचल्या असून त्या तीन दिवस येथे वास्तव्य करत साधू-संतांशी संवाद साधणार असल्याचे समजते.
प्रयागराज महाकुंभमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 फेब्रुवारी रोजी पोहोचतील. त्याचदिवशी दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मागील महिन्यात 13 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी प्रयागराजचा दौरा करत विकासाशी निगडित 5 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण केले होते. यानंतरही पंतप्रधान मोदी हे सातत्याने महाकुंभची तयारी अन् व्यवस्थांचा आढावा घेत आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 जानेवारी रोजी कुंभनगरीचा दौरा करणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील महाकुंभचा अनुभव घेणार आहेत. राष्ट्रपती 10 फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे पोहोचतील. राष्ट्रपतींच्या दौऱ्यावरून तयारीही सुरू झाली आहे. तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे महाकुंभ येथे पोहोचून 1 फेब्रुवारी रोजी पवित्र स्नान करणार आहेत. उत्तरप्रदेश सरकारनुसार आतापर्यंत 8.81 कोटीहून अधिक भाविक महाकुंभमध्ये सामील झाले आहेत.
उद्योजक अदानींकडून अन्नसेवा
महाकुंभच्या 9 व्या दिवशी म्हणजेच मंगळवारी उद्योजक गौतम अदानी यांनी महाकुंभचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. येथे त्यांनी इस्कॉन मंदिरात भगवान कृष्णाची आरती केली आहे. तसेच कुटुंबीयांसोबत तेथील स्वयंपाकघरात जात काम केले आहे. याचबरोबर महाकुंभमध्ये सामील भाविकांना त्यांनी स्वत:च्या हाताने जेवण वाढले आहे. प्रयागराज येथे पत्नी प्रीति अदानीसोबत त्यांनी गंगापूजन केले, त्यानंतर लेटे हनुमान मंदिरात जात दर्शन घेतले आहे. महाकुंभमध्ये सामील झालेल्या भाविकांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून अदानी यांनी काही प्रमाणात आर्थिक भार उचलला आहे.









