14 जुलैच्या राष्ट्रीय परेडमध्ये विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जुलै रोजी पॅरिसमध्ये आयोजित बॅस्टिल डे परेडला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याबाबत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना निमंत्रण दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे. यावर मॅक्रॉन यांनी आनंद व्यक्त करत पंतप्रधान मोदींसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘प्रिय नरेंद्र मोदीजी, 14 जुलैच्या परेडचे सन्माननीय पाहुणे म्हणून पॅरिसमध्ये तुमचे स्वागत करताना मला खूप आनंद होईल’, असा संदेशही मॅक्रॉन यांनी लिहिला आहे.
भारत आणि फ्रान्समधील संबंध सातत्याने दृढ होत आहेत. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागिदारीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैमध्ये फ्रान्सला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स भेटीमुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शैक्षणिक आणि आर्थिक सहकार्यासाठी नवीन लक्ष्याची सुऊवात होण्याची अपेक्षा आहे. भारत आणि फ्रान्स युरोप आणि इंडो-पॅसिफिकमध्ये शांतता आणि सुरक्षिततेसाठी एकत्र काम करत आहेत. तसेच हवामान बदल, जैवविविधतेचे नुकसान आणि शाश्वत विकासाचे लक्ष्य याबद्दल देखील चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.









