प्रतिनिधी / काणकोण
काणकोणला भिडून असलेल्या कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील कारवार-अंकोला मतदारसंघातील विधानसभा निवडणूक कर्नाटक राज्यातील भाजपाच्या नेत्यांबरोबरच गोव्यातील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासहित बहुतेक सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठेची मानली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी कारवारच्या पत्रिका भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांची माहिती दिली. पंतप्रधान मोदी हे 3 मे रोजी कारवारमधील जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेला किमान 3 लाख कार्यकर्ते उपस्थित राहण्याच्या दृष्टीने पक्षाच्या नेत्यांनी लक्ष दिले आहे.
पत्रिका भवनमध्ये घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला विधानपरिषदेचे सदस्य गणपती उळवेकर, नगराध्यक्ष डॉ. नितीन पिकळे, नागराज नाईक, प्रकाश नाईक, प्रेम शेट आणि अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या जाहीर सभेची जागा अद्याप निश्चित झालेली नाही. यापूर्वी नौदलाच्या जागेवर ही सभा घेण्याचा विचार चालू होता. पण 2013 साली निर्वाचन आयोगाने काढलेल्या आदेशात नौदलाच्या जागेचा वापर कोणत्याच पक्षाच्या जाहीर सभेसाठी करू नये असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे नेमक्या कोणत्या जागी पंतप्रधानांची जाहीर सभा होईल हे स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती श्रीपाद नाईक यांनी यावेळी दिली. कारवार जिह्यात येणारे सहा मतदारसंघ जिंकण्याची तयारी करतानाच कारवार-अंकोला मतदारसंघाकडे भाजपाने अधिक लक्ष दिले आहे.









