हट्टीकेरीजवळ युद्धपातळीवर पूर्वतयारी सुरू
प्रतिनिधी/ कारवार
अंकोला तालुक्यातील हट्टीकेरीजवळ दि. 3 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेकडे सर्वांचे लागून राहिले आहे. प्रचारसभेची युद्धपातळीवर पूर्वतयारी करण्यात येत असून शुक्रवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष वेंकटेश नायक, कारवार-अंकोला मतदारसंघातील उमेदवार आणि आमदार रुपाली नाईक, विधान परिषद सदस्य गणपती उळवेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि उपस्थितीत प्रचार सभास्थळी भूमिपूजन करण्यात आले.
अंकोला तालुक्यातील हट्टीकेरी टोल नाक्यापासून काही अंतरावर प्रचार सभेसाठी 40 एकर जमीन निश्चित करण्यात आली असून जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सीबर्ड नाविक दलाच्या मालकीच्या या जागेवर भव्य व्यासपीठ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हेलिपॅड व्यवस्था आणि अन्य मुलभूत सुविधांच्या व्यवस्थेची दखल घेण्यात येत आहे. प्रचारसभेला सुमारे तीन लाख कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात असून त्यांना योग्य आसन व्यवस्था, जेवण आणि सुरक्षिततेची सोय करावी लागणार आहे. प्रचार सभास्थळी दाखल होण्यासाठी 10 गेटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सुमारे 100 इतके सीसीटीव्ही कॅमेरे प्रचारसभेची क्षणचित्रे टिपणार आहेत. सभास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार असून त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हजारो पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. हट्टीकेरी-बेलेकरी रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चार प्रवेशद्वारांवर सुरक्षितता कर्मचारी तपासणी करणार आहेत. दुपारी 12 ते 1 वाजता एक तास प्रचारसभेचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच या भागाचा दौरा करीत असल्याने भाजपसह सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्या आगमनाबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान कारवार जिल्हाधिकारी प्रभूलिंग कवळीकट्टी यांनीही प्रचारसभा स्थळाची पाहणी केली.









