वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्झॉन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा झाली आहे. त्यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. लक्झॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिनंदनाचा संदेश पाठविला होता. सलग तिसऱ्यांदा भारताचे प्रमुखपद मिळविल्यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. दूरध्वनीवरील चर्चेत दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील परस्परसंबंध आणि दृढ करण्याविषयी बोलणी केल्याची माहिती देण्यात आली.
आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंध नवी उंची गाठतील. दोन्ही देश लोकशाही मूल्यांच्या भक्कम पायावर उभे असून त्यांच्यातील हा समान धागा आहे. याच पायावर दोन्ही देशांमधील दृढ संबंध प्रस्थापित झाले असून दोन्ही देशांमधील जनतेतही सुसंवाद आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, अर्थव्यवस्था, दुग्धव्यवसाय, पशुपालन, औषध निर्मिती, शिक्षण आणि संस्कृती तसेच अवकाश संशोधन आणि पर्यावरण संरक्षण आदी विषयांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भक्कम संबंध निर्माण झाले आहेत. हीच दृढता आगामी काळात अधिकाधिक वृद्धिंगत होत जाईल, असा विश्वास या चर्चेत दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यकाळात सहकार्यासंबंधी अनेक योजनांवरही चर्चा झाली, अशी माहिती भारताच्या प्रशासनाकडून शनिवारी दिली असून न्यूझीलंडने तिला दुजोरा दिला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून आभार
सलग तिसऱ्यांना सत्तासूत्रे हाती घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्झॉन यांनी केलेल्या त्यांच्या अभिनंदनामुळे आभार व्यक्त केले. त्यांनी नंतर ‘एक्स’ या सोशल माध्यमावर आभाराचा संदेशही पोस्ट केला. न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या समुदायाच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होत आहेत. न्यूझीलंडमध्ये भारतीय समुदायाच्या सुरक्षेसंबंधी दक्षता चांगल्याप्रकारे बाळगली जाते. तेथील भारतीय समुदायही त्या देशाच्या प्रगतीत भर घालण्यासाठी प्रयत्नशील आहे. दोन्ही देशांमधील जनसंपर्कात तेथील भारतीय समुदाय हा महत्वाचा सेतू आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सहकार्य आणि संबंध यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असून लोकशाही आणि मानवता या सूत्रांच्या आधारे एकमेकांच्या प्रगतीत दोन्ही देश सहभागी होतील, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी चर्चेत व्यक्त केला.









