20 हून अधिक सभांचे आयोजन : काँग्रेस-निधर्मी जनतादलाच्या बालेकिल्ल्यात होणार दौरा
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटकातील निवडणुका जाहीर झाल्या असून विविध राजकीय पक्षांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाने सर्वात आधी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत तयारीमध्ये ते पुढे असल्याचे दाखवून दिले आहे. या अनुषंगाने आता भारतीय जनता पक्षाने देखील आगामी काळामध्ये प्रचारदौऱ्यावर भर देण्याचा निर्धार केला आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास 20 हून अधिक प्रचार सभा आयोजित होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बुधवार दि. 10 मे रोजी कर्नाटकातील विधानसभेच्या 224 जागांसाठीचे मतदान होणार असून त्याकरिता विविध पक्षांनी कंबर कसली असून तयारीला वेग दिला आहे. 6 मे ते 8 मे या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यामध्ये दौरा करणार असून काँग्रेस व निधर्मी जनता दलाच्या टापूतील मतदारसंघांमध्ये ते प्रचार सभा घेतील, असे सांगितले जात आहे. राज्याच्या नेतृत्वपदी असलेल्या भाजप सरकारमध्ये सध्या अंतर्गत कलह दिसून येत असल्याने याला छेद देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरती प्रयत्नांची धार वाढविली जात असल्याचे बोलले जात आहे. 6 विभागांमध्ये मिळून कमीत कमी तीन रॅली काढण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचे समजते.
कुठे होणार सभा
हैद्राबाद-कर्नाटक या भागातील 40 विधानसभा मतदारसंघांमध्ये पंतप्रधान मोदींचा प्रचार दौरा असणार असल्याचे समजते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा या भागामध्ये प्रभाव असल्याने याच भागावर भाजपला लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यादृष्टीने भारतीय जनता पक्षाने आखणी करण्यास सुरुवात केली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या भागातून भाजपला 15 जागा मिळवता आल्या आहेत. त्यामध्ये आणखी भर घालण्यासाठी मोदींच्या प्रचारदौऱ्याची आखणी केली जात आहे.
चाचण्यांचा अंदाज घेतला मनावर
बोम्माई सरकारवर सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचीही टांगती तलवार दिसते आहे. यातून भाजपला सावरताना अनेक अडचणी जाणवत आहेत. याआधीच्या कर्नाटकात झालेल्या पंतप्रधानांच्या रॅलीजना चांगला प्रतिसाद लाभला आहे. म्हणूनच विधानसभा मतदारसंघातील स्थानिक उमेदवारांच्या चेहऱ्यासोबतच पंतप्रधानांना त्या ठिकाणी पाचारण करून भाजपचे पारडे जड करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या वेळेला बऱ्याचशा झालेल्या मतदानपूर्व चांचण्यांमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे संकेत व्यक्त केले गेले आहेत. त्याचसोबत काहींनी काँग्रेस या खेपेस सत्तेत येईल, असाही अंदाज वर्तविला असल्याने या दोन्ही संकेतांमुळे भाजपच्या गोटामध्ये चिंतेचे वातावरण आहे. हे वातावरण पंतप्रधान मोदींच्या प्रचारदौऱ्यांच्या माध्यमातून बदलाचा प्रयत्न होणार आहे.
विद्यमान मुख्यमंत्र्यांना बहुमताचा विश्वास
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी अलीकडेच एका माध्यम समूहाशी बोलताना आगामी काळात भाजपच स्पष्ट बहुमत मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला होता व पुढील काळामध्ये निधर्मी जनता दलाशी युती करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. किंबहुना भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याने युतीचा प्रश्नच उद्भवणार नसल्याचेही बोम्माई यांनी माध्यमांना सांगितले आहे. अलीकडेच बी. एस. येडियुराप्पा यांनी माध्यमांना पुढील मुख्यमंत्र्यांसंदर्भात वक्तव्य करताना हायकमांड याबाबत निर्णय घेणार असल्याचे म्हटल्याने त्याबाबतीत लोकांमध्ये वेगळी चर्चा ऐकायला मिळते आहे.
अभयारणाच्या सुवर्णमहोत्सवात मोदींची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 एप्रिल रोजी बंदीपूर व्याघ्र अभयारण्याला भेट देणार असल्याची माहिती आहे. या अभयारण्याला 50 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटनाला त्यांची उपस्थिती असणार आहे, असे कळते.
राहुल गांधींनी सरसावल्या बाह्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 एप्रिलला कर्नाटकाच्या दौऱ्यावर म्हैसूरमध्ये येत असल्याचे पाहून काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी आपला ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम त्याच दिवशी ठेवला असल्याचे सूत्रांकडून समजते. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे राहुल गांधींनी आपला कार्यक्रम बदलला असल्याचे सांगितले जात आहे. सत्यमेव जयते हा कार्यक्रम यापूर्वी 5 एप्रिल रोजी होणार होता.









