भारतीय वंशाच्या समुदायाचा जल्लोषी कार्यक्रम
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी
फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहोचले असून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतार्थ येथील भारतीय वंशाच्या समुदायाने शानदार कार्यक्रमाचे आयोजन केले. भारतीय प्रमाणवेळेनुसार गुऊवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे एनएसए मायकल वॉल्ट्झ आणि त्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कडाक्याची थंडी असूनही या कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. भारत आणि अमेरिका यांचे राष्ट्रध्वज फडकविण्यात आले होते. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या जयजयकाराच्या घोषणाही देण्यात आल्या. त्यांनी उपस्थित लोकांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांच्या वास्तव्याची व्यवस्था व्हाईट हाऊसनजीक असणाऱ्या ब्लेअर हाऊस या आलिशान वास्तूत करण्यात आली आहे. याच वास्तूत त्यांची अमेरिकेच्या गुप्तचर विभाग प्रमुख तुलसी गॅबार्ड यांच्याशी भेट झाली. दोन्ही नेत्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा करुन एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
ट्रम्प यांच्याशी रात्री उशिरा चर्चा
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा मध्यरात्री उशिरा होणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील मुख्य कार्यक्रम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करणे हा होता. ही चर्चा भारतीय प्रमाणवेळेनुसार 14 फेब्रुवारीला रात्री अडीच वाजता आहे. या चर्चेचा वृत्तांत भारतात 15 फेब्रुवारीला अर्थात शनिवारी प्रसिद्ध होणार आहे.
ट्रम्प यांच्याशी मैत्रीचा उल्लेख
भारतीय समुदायाच्या लोकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असणाऱ्या आपल्या मैत्रीसंबंधांचा आवर्जून उल्लेख केला. ट्रम्प यांच्या प्रथम कार्यकाळात आम्ही अनेक विषयांवर एकत्र कार्य केले आहे. ही माझी त्यांच्याशी त्यांच्या द्वितीय कार्यकाळातील प्रथम भेट आहे. त्यांच्या या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील आणि विस्तारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही दोन्ही देशांच्या परस्पर हितांसाठी आणि विकासासाठी काम करणार आहोत, असेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी केले.









