आमदार राजेश फ्ढळदेसाई : आमोणे येथे भाजपाचे ‘संपर्क से समर्थन’ अभियान
वार्ताहर /जुने गोवे
केंद्रातील भाजपाच्या दुहेरी इंजिन सरकारने देशभरात वेगवान विकासकामे सुरू केली आहेत. रस्त्यांचे जाळे असो, आरोग्यसेवा, शिक्षण आणि समाजकल्याण असो, भाजपा सरकार देशाच्या विकासासाठी कोणतीही कसर सोडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगात समृद्धीचे एक उत्तम उदाहरण बनले आहेत, असे प्रतिपादन कुंभारजूवेचे आमदार तथा गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी केले. लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने विविध क्षेत्रातील पाच लाख प्रमुख नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘संपर्क से समर्थन’ अभियान सुरू केले आहे. या अभियानचा एक भाग म्हणून आमदार राजेश फळदेसाई यांनी सांखळी मतदारसंघातील आमोणा येथील काही मतदारांच्या घरांना भेट देवून केंद्रातील मोदी सरकारने 9वर्षांच्या काळात केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. या अभियानात आमदार फळदेसाई यांनी आमोणेतील विविध क्षेत्रातील लोक आणि प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला. संवादावेळी मोदी सरकारच्या यशाबद्दल आणि कामगिरीबद्दल चर्चा केली आणि त्यांना केंद्र व राज्य सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रम आणि योजनांची माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.









