खासदार जगदीश शेट्टर यांनी घेतली भेट
बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनच्या स्थापनेला दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. खासदार जगदीश शेट्टर यांनी दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांची भेट घेत त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्याचबरोबर बेळगावच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. बेळगाव बार असोसिएशनचा 150 वा वर्धापन दिन 4 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातील वकील संघटनांचे पदाधिकारी, तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही उपस्थित राहण्याची विनंती खासदार शेट्टर यांनी केली. यावेळी पंतप्रधानांनी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू, असे आश्वासन दिले. बेळगाव-बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेसला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. या रेल्वेला पंतप्रधानांनी लवकर हिरवा झेंडा दाखवावा,अशी मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली. यासंदर्भात आपण रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले.









