राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नविन संसद भवनाचे उद्धाटन करावे असा आग्रह करणाऱ्या विरोधी पक्षांनी टाकलेल्य़ा बहिष्काराच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी संसदेतील फलकाचे अनावरण करून औपचारिक उद्धाटने केले.
हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींकडून 75 रुपयांचे विशेष नाण्याचे अनावरण
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “नवी संसद भवन ही नव्या भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. ही इमारत गरीब आणि उपेक्षितांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा करेल आणि “विकसित भारता”च्या उदयाचा घोष करून प्रगतीला प्रेरणा मिळेल.” असे उद्गार काढले आहेत.
मोराच्या आकृतिबंधात सुशोभित केलेल्या आणि भव्यदिव्य असलेल्या लोकसभेच्या सभागृहातून दिलेल्या भाषणात, पंतप्रधान मोदी म्हणाले की, “संसदेच्या सदस्यांच्या संख्येत अपेक्षित वाढ लक्षात घेता अत्याधुनिक कॉम्प्लेक्स ही “काळाची गरज” आहे. राष्ट्राच्या विकासाच्या प्रवासातील काही क्षण अमर होतात, आजचा दिवस त्यातीलच एक आहे,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “नवीन संसदेमध्ये 1.4 अब्ज लोकांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचा समावेश आहे. या इमारतीतून भारताच्या अटल निर्धाराबद्दल जगाला एक शक्तिशाली संदेश पाठवला जाईल,” असेही ते म्हणाले