फातोड्यातील सभेतून गोव्याच्या जनतेला संबोधणार
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. 6 फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या गोवा भेटीवर येत आहेत. बेतुल येथे एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन करून त्यानंतर सायंकाळी फातोर्डा स्टेडियमच्या शेजारी होणाऱ्या विराट सभेत ते जनतेला मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या गाभा समितीची बैठक काल मंगळवारी सायंकाळी पणजीत झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांच्या गोवा भेटीसंदर्भात चर्चा करण्यात आली. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाचे औचित्य साधून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मडगावमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा नारळ वाढविण्याचा मूहूर्त काढण्यात आला. त्यानुसार पंतप्रधानांचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम झाल्यानंतर लागलीच ते मडगावला येतील व तिथून गोव्याच्या जनतेला संबोधतील. बेतुल येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या केंद्राच्या आधारे भारतीय आंतरराष्ट्रीय उर्जा सप्ताह होणार असून त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते 6 फेब्रुवारी रोजी होईल. या कार्यक्रमात सुमारे 30 राष्ट्रे सहभागी होणार आहेत.
पळवाट काढणार काय?:आलेमाव
घाबरलेले भाजप सरकार 6 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधानांच्या गोवा भेटीचे कारण देत गोवा विधानसभा अधिवेशनाचा कार्यकाळ कमी कऊन विरोधकांच्या सरळ प्रश्नांना सामोरे जाण्यापासून पळवाट काढणार नाही अशी आशा बाळगतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केली.









