वृत्तसंस्था/ जगरेब
भारतीय पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी कॅनडाहून क्रोएशियाला पोहोचले. पंतप्रधानांच्या तीन देशांच्या दौऱ्यातील हा शेवटचा टप्पा आहे. राजधानी जगरेबमध्ये भारतीय समुदायाने पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी मंत्रोच्चार, घोषणाबाजी करतानाच भारतीय नृत्य सादर केले. पंतप्रधान मोदी येथे क्रोएशियामध्ये पंतप्रधान आंद्रेज प्लेनकोविक यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. याशिवाय ते राष्ट्रपती झोरोन मिलानोविक यांनाही भेटतील. भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच क्रोएशिया दौरा आहे. येथे 17 हजारांहून अधिक भारतीय राहतात. क्रोएशियाला पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 शिखर परिषदेत पाहुणे राष्ट्र म्हणून सहभागी झाले होते. या काळात त्यांनी अनेक जागतिक नेत्यांना भेटून चर्चा केली.









