कुस्तीपटूंसोबतच्या बैठकीवेळी क्रीडामंत्री मोबाईलमध्ये व्यस्त : 15 जून रोजी करणार मोठी घोषणा
वृत्तसंस्था/ पानिपत
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण आणि कुस्तीपटूंमधील वादादरम्यान विनेट फोगाट हिने मोठे दावे केले आहेत. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनामुळे आम्ही दुखावलो गेलो आहोत. कुस्तीपटू हे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासमोर भूमिका मांडत असताना ते मोबाईलमध्ये व्यस्त होते. क्रीडामंत्र्यांना आमचे म्हणणे ऐकण्यास कुठलाच रस नव्हता असा आरोप विनेश फोगट यांनी केला आहे.
क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी कुस्तीपटूंशी संवाद साधला होता. 15 जूनपर्यंत याप्रकरणी आरोपपत्र सादर होईल, असे आश्वासन ठाकूर यांनी दिले होते. आम्ही आता आरोपपत्राची प्रतीक्षा करत आहोत. बृजभूषण यांच्यावर कुठलीच ठोस कारवाई न झाल्यास 15 जून रोजी रात्री बैठक घेत पुढील आंदोलनाच्या निर्णयाची घोषणा केली जाणार आहे. सरकारने दिल्लीतील जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करण्यापासून रोखल्यास रामलीला मैदान किंवा अन्य ठिकाणी आंदोलन सुरू करू असे विनेशने म्हटले आहे.
प्रशिक्षण शिबिर किंवा स्पर्धेदरम्यान बृजभूषण हे महिला कुस्तीपटूंना एकांतात गाठून स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचे. हा प्रकार वारंवार घडायचा. बृजभूषण हे शक्तिशाली व्यक्ती असून ते सर्व ठिकाणी फिरत आहेत आणि आम्हाला घरी बसण्यासाठी भाग पाडले जात आहे. आमचे म्हणणे देखील कुणी ऐकून घेत नव्हता. नाईलाजास्तव आम्हाला आंदोलन करावे लागल्याचा दावा विनेशने केला आहे.
दिल्ली पोलिसांकडून तपास
महिला कुस्तीपटूंच्या शोषणाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कजाकिस्तान, मंगोलिया आणि इंडोनेशियाकडून तपासात मदत मागितली आहे. या देशांच्या कुस्ती महासंघांना नोटीस बजावून संबंधित ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज अन् छायाचित्रे पुरविण्यास सांगण्यात आले आहे. कुस्तीपटूंनी 2016 आणि 2022 साली मंगोलिया तर 2018 मध्ये इंडोनेशियात छेडछाडीची घटना घडल्याचा आरोप केला होता.
भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक 4 जुलैला
भारतीय ऑलिम्पिक संघटना 4 जुलै रोजी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक करविणार आहे. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश महेश मित्तल कुमार यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक करविण्याची मागणी आंदोलक कुस्तीपटूंनी केली होती. सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे.









