पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी आपल्या वाराणसी मतदारसंघात ‘मंत्रीशक्ती’ संम्मेलनाचे आयोजन केले आहे. या संम्मेलनाच्या माध्यमातून 25 हजार महिलांशी संपर्क केला जाणार आहे. अशा प्रकारचा हा प्रथमच कार्यक्रम आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या वाराणसी पदाधिकाऱ्यांनी दिली. या संम्मेलनात गृहिणी, डॉक्टर्स, शिक्षिका, उद्योजिका, विधिज्ञ आणि खेळाडू असणाऱ्या महिलांना आमंत्रित करण्यात आले आहे. वाराणसीतील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाराणसी मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्राच्या कक्षेत वास्तव्य करणाऱ्या महिलांना या कार्यक्रमाला घेऊन येण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाने आपल्या वाराणसीतील महिला कार्यकर्त्यांना केले आहे. महिला महाविद्यालयांच्या प्राध्यापिका, विद्यार्थिनी, तसेच महिला कर्मचारी यांना या संम्मेलनाला आमंत्रित करण्यात आले आहे, अशीही माहिती भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आली.
सातव्या टप्प्यात मतदान
वाराणसी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात 1 जूनला मतदान घेण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मतदारसंघातून दोनदा प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले आहेत. त्यांना यावेळी हॅटट्रिकची अपेक्षा आहे. वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक रोड शोही केला आहे.








