वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशमधील आदिवासी नेत्यांशी संपर्क साधला आहे. आपल्या ज्या अडचणी आहेत, त्या मोकळेपणी आम्हास सांगाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. हे आदिवासी नेते त्यांना भेटण्यासाठी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी आलेले होते. काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये हिंसाचार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा अरुणाचल प्रदेशमधील आदिवासी नेत्यांशी संवाद महत्त्वाचा मानण्यात येत आहे. अरुणाचल प्रदेशमधील अनेक जातीजमातींच्या नेत्यांचा समावेश पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणाऱ्या शिष्टमंडळामध्ये होता.
अरुणाचल प्रदेशची मोठी सीमा चीनला लागून आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे या राज्याकडे विशेष लक्ष आहे. या राज्यात विविध समाज घटकांमध्ये सलोख्याचे संबंध असणे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसे न झाल्यास अरुणाचल प्रदेशमधील विविध जातीजमातींमध्ये फूट पाडण्याचे उद्योग चीनकडून केले जाऊ शकतात. म्हणून खबरदारीची उपाय योजना भारत सरकारकडून करण्यात येत आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या भेटीची माहिती दिली. प्रथमच मणिपूरमधील आदिवासी नेते पंतप्रधान मोदी यांना भेटले असल्याचे त्यांनी सांगितले. चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडल्याचीही माहिती त्यांनी दिली.









