वृत्तसंस्था/ दुबई
इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास यांच्यात युद्ध सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, 1 डिसेंबरला इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हरझोग यांची दुबईमध्ये भेट घेतली. संयुक्त अरब अमिरातीमध्ये सीओपी-28 जागतिक हवामान शिखर परिषदेच्या वेळी त्यांनी हरझोग यांच्याशी चर्चा केली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी इस्रायल आणि पॅलेस्टाईन समस्येवर द्विराष्ट्रीय तोडगा, संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून लवकर आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भारताच्या समर्थनावर भर दिला.
हरझोक यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तसेच ओलिसांच्या सुटकेचे स्वागत केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धबाधित लोकांपर्यंत मानवतावादी मदत सतत आणि सुरक्षितपणे पोहोचवण्याच्या गरजेचा पुनऊच्चार केला. तसेच इस्रायल-हमास संघर्षावर विचार विनिमय केल्याचेही बागची म्हणाले.
हरझोग काय म्हणाले?
सीओपी-28 परिषदेत मी जगभरातील अनेक नेत्यांना भेटलो. मी त्यांच्याशी हमासने युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याबद्दल बोललो आणि ओलिसांची सुटका आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अजेंडाच्या शीर्षस्थानी ठेवण्याच्या माझ्या आवाहनाचा पुनऊच्चार केला. इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा आदर करण्यासंबंधीही नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांशी बोलणे झाल्याचे इस्रायचे राष्ट्राध्यक्ष हरझोग यांनी सांगितले.
हमासने 7 ऑक्टोबरला सकाळी अचानक इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. यावेळी त्यांनी घुसखोरीही केली होती. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासविरोधात युद्ध छेडण्याची धमकी देत जोरदार प्रतिकार सुरू केला आहे.









