रालोआच्या तिसऱ्या कार्यकाळातील प्रथम वर्ष पूर्ण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या सत्ताकाळाचे प्रथम वर्ष लवकरच पूर्ण होत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवार, 4 जूनला होणार आहे. 6 जूनला रालोआच्या तिसऱ्या कार्यकाळातील प्रथम वर्षाची पूर्ती होणार आहे. ही बैठक दिल्लीतील सुषमा स्वराज भवनात आयोजित केली जाणार आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले होते. त्यानंतर 6 जून 2024 या दिवशी या सरकारचा सलग तिसऱ्यांदा शपथविधी झाला होता. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 543 पैकी 293 जागा मिळाल्या होत्या. भारतीय जनता पक्षाला स्वत:ला 240 जागा मिळाल्या होत्या. 4 जूनच्या बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या तिसऱ्या कार्यकाळातील प्रथम वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. ही आघाडी 2014 पासून सत्तेवर आहे. तिसऱ्या कालखंडाच्या या प्रथम वर्षात सरकारची उपलब्धी कोणती होती यावर या बैठकीत विचार केला जाणार असून ही उपलब्धी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याकरिता पावले उचलली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. तिसऱ्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याशी बोलून त्याची मते जाणून घेणार आहेत.
सिंदूर अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक
22 एप्रिलला जम्मू-काश्मीरच्या पहलगाम या पर्यटनस्थळी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला होता. त्यानंतर 7 मे या दिवशी भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करुन या हल्ल्याचा बदला घेतला होता. त्यानंतर तीन दिवस दोन्ही देशांमध्ये चाललेल्या सशस्त्र संघर्षात पाकिस्तानच्या अनेक वायुतळांवर भारताने हल्ला केला होता आणि पाकिस्तानची मोठी हानी केली होती. या अभियानाला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयाजित करण्यात आली असून त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
बैठकीत काय निर्धारित होणार…
या बैठकीची निश्चित कार्यक्रमपत्रिका प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या 11 वर्षांमध्ये पेलेल्या कामगिरीचा आढावाही या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच आगामी चार वर्षांमध्ये सरकार कोणत्या धोरणांच्या अनुसार आणि कशाप्रकारे काम करणार आहे, याची रुपरेषाही निर्धारित केली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सर्व केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार असून त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. तसेच त्यांच्या विभागाच्या कामगिरीची माहिती घेणार आहेत, अशीही शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सरकारने या बैठकीसाठी जोरदार सज्जता केली आहे, अशीही माहिती दिली गेली.









