पाकिस्तानच्या उपस्थितीतच एससीओ परिषदेत केली चौफेर टीका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘दहशतवाद हा विभागीय आणि जागतिक शांततेसाठी सर्वात मोठा धोका आहे. आपल्या सर्वांना या धोक्याविरोधात एकत्रितरित्या संघर्ष करावा लागणार आहे. काही देश आपल्या भूमीवरुन सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देतात. त्यांच्या दृष्टीने दहशतवाद हा त्यांच्या धोरणाचा भाग आहे. अशा देशांना रोखण्यात आले पाहिजे. शांघाय सहकार्य संघटनेने (एससीओ) अशा देशांवर कठोर टीका करण्यास कचरु नये. कोणत्याही कारणास्तव किंवा निमित्ताने दहशतवादाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जाऊ नये, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत भाषण करताना दिला आहे. पाकिस्तान पंतप्रधान शाबाझ शरीफ यांच्या उपस्थितीतच त्यांनी अप्रत्यक्ष रितीने पाकिस्तानला खडे बोल सुनावले.
यंदा या परिषदेचे आयोजन करण्याचा मान भारताला मिळाला आहे. या कार्यक्रमाला चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, पाकिस्तानचे पंतप्रधान शाबाझ शरीफ व परिषदेच्या इतर सदस्य देशांचे नेते ऑन लाईन उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचे उद्घाटन व्हर्चुअल पद्धतीने केले. त्यानंतर त्यांनी प्रमुख भाषण करताना विविध मुद्द्यांचा उहापोह केला.
भाषेचे अंतर संपविणार
एससीओ सदस्य देशांमध्ये अनेक भिन्न भिन्न भाषा बोलल्या जातात. भाषांमधील या अंतराचा संवादावर परिणाम होऊ नये म्हणून भारताने कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ‘भाषिनी’ नामक भाषामंच स्थापित केला आहे. हा मंच या संघटनेच्या सर्व सदस्य देशांना उपलब्ध करुन देण्याची भारताची इच्छा आहे. सदस्य देशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पाकिस्तान एकाकी
पाकिस्तान हा देश दहशतवादाला उघड प्रोत्साहन देत असल्याने तो जगाच्या मंचावर एकाकी पडला आहे. तथापि, यंदा अनेक वर्षांनी प्रथमच त्या देशाला एका आंतरराष्ट्रीय मंचावर उपस्थित दर्शविण्याची संधी मिळाली आहे. चीनही यात सहभागी होत आहे. या संघटनेची भविष्य काळात अधिक वाढ व्हावी आणि सदस्य देशांमध्ये सहकार्य वृद्धी व्हावी अशी चीनची इच्छा असून त्यासाठी पुढाकार घेण्यास चीन तयार आहे, असे त्या देशाचे प्रतिनिधी माओ निंग यांनी स्पष्ट केले.
अनेक विषयांवर चर्चा होणार
या परिषदेत अफगाणिस्थान, दहशतवाद, विभागीय सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा आणि डिजिटल सर्वसमावेशकत्व तसेच इतर अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच, आर्थिक विकास, परस्पर संपर्क, एकात्मता, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मतेचा सन्मान आणि पर्यावरण संरक्षण या या संघटनेच्या प्रमुख तत्वांवरही या परिषदेत चर्चा होणार आहे. परस्पर व्यापार आणि आर्थिक सहकार्यवृद्धीवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती परिषदेच्या आयोजकांनी दिली आहे.
दोन्ही परिषदांचे अध्यक्षस्थान
या वर्षी भारताला जी-20 परिषद आणि एसीओ या दोन्ही संघटनांचे अध्यक्षस्थान लाभले आहे. त्यामुळे भारतात यंदा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांची रेलचेल आहे. या दोन्ही संघटनांच्या सदस्य देशांमध्ये एकाच वेळी सहकार्य आणि तणावसुद्धा आहेत. दोन्ही संघटनांचे अध्यक्षस्थान भारताकडे असल्याने भारताला सर्व देशांशी संबंध ठेवताना तारेवरची कसरत करावी लागेल अशी चर्चा होती. तथापि, भारताने हे आव्हान अतिशय सहजपणे पेलल्याच आतापर्यंत दिसून येत आहे. यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठाही वाढली आहे.









